पंचदशी – प्रकरण ०३ – पञ्चकोषविवेकः
गुहाहितं ब्रह्म यत्तत्पञ्चकोष विवेकतः ।
बोद्धुं शक्यं ततः कोषपञ्चकं प्रविविच्यते ॥ १ ॥
गुरु – “यो वेद निहितं गुहायां” या श्रुतीने जें गुहेमध्ये असणारे ब्रह्म सांगितलें, तें पंचकोशांच्या विवेकाने समजण्याजोगे आहे. याकरितां आम्ही पंचकोशांचें विवेचन करून दाखवितों. ॥१॥
देहादभ्यन्तरः प्राणः प्राणादभ्यन्तरं मनः ।
ततः कर्ता ततो भोक्ता गुहा सेयं परम्परा ॥ २ ॥
शि०- श्रुतींनी जी गुहा सांगितली, ती कोणती ? गु०- या अन्नमय स्थूल देहाच्या आंत प्राण आहेत. प्राणांच्या आंतल्या बाजूस मन आहे. मनाच्याही आंतल्या बाजूस कर्ता म्हणजे विज्ञानमय कोश आहे. त्याच्याही आंत भोक्ता म्हणजे आनंदमय कोश आहे. अशी जी अन्नमयापासून आनंदमयापर्यंत परंपरा सांगितली त्या परंपरेस गुहा असे म्हणतात. ॥२॥
पितृभुक्तान्नजाद्वीर्याज्जातोऽन्नेनैव वर्धते ।
देहः सोऽन्नमयो नात्मा प्राक्चोर्ध्वं तदभावतः ॥ ३ ॥
शि०- या प्रत्येक कोशाचे स्वरूप काय आहे, ते कृपा करून सांगा. गु०- जो देह आईबापांनी भक्षिलेलें जें अन्न त्यापासून तयार झालेल्या वीर्यापासून उत्पन्न झाला, तो अन्नभय कोश होय. हा कोश आत्मा म्हणतां येत नाहीं. कारण, उत्पत्तीपूर्वी व मरणानंतर त्याचा अभाव आहे. जो पदार्थ कार्य आहे, तो पदार्थ नाशवंत आहे. देह हें कार्य असल्यामुळें त्याला अर्थातच नाश आहे. ॥३॥
पूर्वजन्मन्यसत्त्वे तज्जन्म सम्पादयेत्कथम् ।
भाविजन्मन्यसत्कर्म न भुञ्जीतेह संचितम् ॥ ४ ॥
शि०- आपण सांगितलेला हेतु खरा आहे, त्या हेतूपासून जी गोष्ट आपण सिद्ध केली, ती मात्र संभवत नाही. म्हणून तो हेतु अप्रयोजक आहे, असें मला वाटते. कारण आपण देहाला जसे कार्यत्व लागूं केलें; तसें माझ्या मतें आत्म्यालाही कार्यत्वच येतें. तेव्हां देहालाच आत्मा म्हणण्यास कोणची हरकत आहे. ? गु०-आत्म्यास कार्यत्व लागू केलें असतां दोन दोष प्राप्त होतात. एक अकृताभ्यागम म्हणजे काही न करतां परिणाम घडणे, आणि कृतप्रणाश म्हणजे केलेल्या कर्माचा कांहींच परिणाम न होतां नाश होणें, ह्या दोन्ही गोष्टी असंभवनीय आहेत. कारण या देहास जर तूं आत्मा म्हणतोस तर, हा देहात्मा पूर्वजन्मीं नव्हता, असे म्हणावें लागेल. आणि तसे समजल्यास या जन्माची प्राप्ति कशी होईल, म्हणून येथे अकृताभ्यागम दोष आला. तसेंच पुढील जन्मी हा देहरूप आत्मा नाहीं म्हटल्यास, आतां केलेल्या पुण्यपापाचा फलभोग घेण्यास पुढें कोणी नसल्यामुळें कर्मक्षय होऊन कृतप्रणाश दोष येऊ पहातो. याकरितां आत्मा कशाचे तरी कार्य आहे, म्हणून अन्नमय कोश आत्मा नव्हे हे सिद्ध झालें. ॥४॥
पूर्णो देहे बलं यच्छन्नक्षाणां यः प्रवर्तकः ।
वायुः प्राणमयो नासावात्मा चैतन्यवर्जनात् ॥ ५ ॥
शि०- बरें, हा अन्नभय कोश नसेल तर नसो; परंतु प्राणमय कोशास आत्मा म्हणण्यास कोणती हरकत आहे. ? गु०- अन्नमयाप्रमाणें प्राणमयालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. याचें तुला स्वरूप दाखवून नंतर अनात्मत्व सिद्ध करून दाखवतों. जो वायु देहाचेठायीं आपादमस्तक व्याप्त असून व्यानरूपानें शरीरास सामर्थ्य देतो, व जो नेत्रादिक इंद्रियांचा प्रेरक आहे, त्या वायूस प्राणमय कोश असें म्हणतात. या कोशालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. कारण, याला चैतन्य म्हणजे ज्ञान मुळींच नाहीं. म्हणून हा जड आहे. याजकरितां काष्ठपाषाणादि पदार्थास आत्मा म्हणणें जसे योग्य नाही, तसें या प्राणमय कोशालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. ॥५॥
अहन्तां ममतां देहे गृहादौ च करोति यः ।
कामाद्यवस्थया भ्रान्तो नासावात्मा मनोमयः ॥ ६ ॥
शि०- बरें, मनोमय कोशाला तरी आत्मा म्हणतां येईल किंवा नाही ? मला तर असें वाटतें कीं, मन हें प्राणाप्रमाणे जड नाही, म्हणून हेंच आत्मा आहे. गु०- त्याचेंही स्वरूप तुला सांगतो. म्हणजे पूर्वोक्त दोन कोशांप्रमाणे हा कोशही आत्मा नव्हे, हे तुझ्या ध्यानांत येईल. जो या देहाला मी मी म्हणतो व गृहादिकांला माझें माझें असे म्हणता, त्या कोशास मनोमय कोश असे म्हणतात. हाही आत्मा होऊं शकत नाहीं. कारण, हा कामक्रोधादिक वृत्तीचा बनला असल्यामुळे चंचल व अनियमित आहे, म्हणून यास आत्मा म्हणतां येत नाहीं. ॥६॥
लीना सुप्तौ वपुर्बोधे व्याप्नुयादानखाग्रगा ।
चिच्छायोपेतधीर्नात्मा विज्ञानमयशब्दभाक् ॥ ७ ॥
शि०- बरें, विज्ञानमय कोश तरी आत्मा होऊं शकेल कीं नाहीं ? गु०- त्याचेंही तुला लक्षण सांगतो. जी बुद्धि चिदाभासानें युक्त होऊन सुषुप्तींत लय पावते, आणि जागृतींत शरीरास नखशिखांत व्यापून रहाते, तिला विज्ञानमयकोश म्हणतात. हिला विलयादिक अवस्था असल्यामुळें आत्मा म्हणता येत नाहीं. ॥७॥
कर्तृत्वकरणत्वाभ्यां विक्रियेतान्तरिन्द्रियम् ।
विज्ञानमनसी अन्तर्बहिश्चैते परस्परम् ॥ ८ ॥
शि०- मन आणि बुद्धि या दोनही अंतःकरणाच्याच अवस्था आहेत, तेव्हां मनोमय आणि विज्ञानमय अशा दोन कोशांची कल्पना न करतां दोन्ही मिळून एकच कोश असें कां मानलें नाहीं ? गु०- याचें कारण हेंच की, दोन्ही जरी अंतःकरणाचींच रूपें आहेत, तरी कर्ता आणि कारण अशीं दोन रूपें दोहींची भिन्न भिन्न असल्यामुळें एकाला विज्ञानमय आणि दुसर्याला मनोमय असें म्हटलें. एकच, अंतःकरण आत असतांना कर्ता असतो आणि तोच बाहेर आल्यावर मन होतें, म्हणून दोन कोशांची कल्पना जी केली, ती योग्यच आहे. ॥८॥
काचिदन्तर्मुखा वृत्तिरानन्दप्रतिबिम्बभाक् ।
पुण्यभोगे भोगशान्तौ निद्रारूपेण लीयते ॥ ९ ॥
शि०- हे चारही कोश आत्मा नव्हे अशी माझ्या मनाची खात्री बरीच झाली. परंतु पांचवा जो आनंदमय कोश, ज्यास भोक्ता असें म्हणतात, तो मात्र आत्मा नव्हे असें कधीं म्हणतां येणार नाही गु०- त्याला देखील आत्मा म्हणतां येत नाहीं. त्याचें तुला येथें लक्षण सांगतों, म्हणजे त्याचेंही अनात्मत्व तुझ्या लक्षांत येईल. पुण्यकर्माचे फल अनुभवित असतां कोणी एक अंतःकरणाची वृत्ति अंतर्मुख होऊन तिजमध्यें आत्मस्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब पडतें, व तीच वृत्ति पुण्यभोग संपला म्हणजे निद्रारूपानें लय पावते. ॥९॥
कादाचित्कत्वतो नात्मा स्यादानन्दमयोऽप्ययम् ।
बिम्बभूतो य आनन्द आत्मासौ सर्वदा स्थितेः ॥ १० ॥
गु०- या वृत्तीसच आनंदमयकोश असें म्हणतात. ही वृत्ति अमुक काळपर्यंत राहणारी आहे, म्हणून ही अनित्य आहे, तिला आत्मा कसें म्हणतां येईल ? पण या वृत्तींत ज्याचें प्रतिबिंब पडलें अशी जी एक बिंबभूत वस्तु, तिला आत्मा म्हणतां येईल. कारण, ती सर्वदा सारखी राहणारी आहे. ॥१०॥
ननु देहमुपक्रम्य निद्रानन्दान्तवस्तुषु ।
माभूदात्मत्वमन्यस्तु न कश्चिदनुभूयते ॥ ११ ॥
शि०- अन्नमयापासून आनंदमयापर्यंत सर्व पांचही कोश आत्मा नव्हे असें आपण सिद्ध करून दाखविले खरे, परंतु या पांच कोशांखेरीज सहावा कोणीच दिसत नाहीं, तेव्हां आपण जो आत्मा म्हणतां, तो कोठे आहे ? ॥११॥
बाढं निद्रादयः सर्वेऽनुभूयन्ते न चेतरः ।
तथाप्येतेऽनुभूयन्ते येन तं को निवारयेत् ॥ १२ ॥
गु०-अरे, आनंदमयापासून अन्नमयापर्यंत पांचही कोश ज्याच्या अनुभवास आले, तोच आमचा आत्मा, तो नाहीं असे म्हणतां येईल काय ? ॥१२॥
स्वयमेवानुभूतित्वात्विद्यते नानुभाव्यता ।
ज्ञातृज्ञानान्तराभावादज्ञेयो न त्वसत्तया ॥ १३ ॥
शि०- तुम्ही जो आत्मा सांगता तो जर खरोखर असता, तर आमच्या अनुभवास आला असता; ज्या अर्थीं अनुभवास येत नाहीं, त्या अर्थी तो नाहींच असें म्हटलें पाहिजे. गु०- आम्हीं जो पंच कोशांचा साक्षी सांगितला, तो स्वत: अनुरूपच असल्यामुळें तो अनुभवास विषय होऊं शकत नाहीं. याचें कारण असें आहे कीं, तेथे ज्ञाता व ज्ञान दोन्हींही नसल्यामुळे तो ज्ञानास विषय होत नाहीं, तथापि त्याचे अस्तित्व कोठे जाईल ? पूर्वोक्त पंचकोश ज्याच्या अनुभवास आले, तो साक्षी असलाच पाहिजे. याला एक दृष्टांत देतो, म्हणजे अनुभवरूप आत्म्याला अनुभवविषयत्व संभवत नाहीं हे तुला स्पष्टपणें समजून येईल. ॥१३॥
माधुर्यादिस्वभावानामन्यत्र स्वगुणार्पिणाम् ।
स्वस्मिंस्तदर्पणापेक्षा नो न चास्तान्यदर्पकम् ॥ १४ ॥
साखर व लिंबू यांसारखे जे स्वभावत: अनुक्रमें गोड व आंबट पदार्थ आहेत ते दुसर्या पिठासारख्या किंवा पाण्यासारख्या पदार्थांत मिश्र केले असतां त्या पिठास किंवा पाण्यास गोडी किंवा आंबटपणा येतो. परंतु त्या साखरेस व लिंबास गोड किंवा आंबट करण्यास पिष्टादि पदार्थ समर्थ नाहींत. ॥१४॥
अर्पकान्तराराहित्येप्यस्त्येषां तत्स्वभावता ।
माभूत्तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते ॥ १५ ॥
कारण, ते स्वभावत: गोड व आंबट असल्यामुळे दुसर्या पदार्थांच्या मिश्रणाची त्यांस गरजच नाही. त्याप्रमाणे आत्मा हा अनुभवास विषय जरी न झाला, तरी स्वतःसिद्ध तो बोधरूप असल्यामुळे त्याचें अस्तित्व कधींही नाहीसें करतां येणार नाहीं. यास श्रुतीचे प्रमाणही आहे. ॥१५॥
स्वयंज्योतिर्भवत्येष पुरोऽस्मात्भासतेऽखिलात् ।
तमेव भान्तमन्वेति तद्भासा भासते जगत् ॥ १६ ॥
हा पुरुष स्वयंज्योति आहे. सर्व विषयांच्या पूर्वीं हा भासतो. असा जो भासमान आत्मा त्याला अनुसरूनच सर्व, जगत् भासतें म्हणून त्याच्या प्रकाशानेंच सर्व पदार्थ भासतात इत्यादि श्रुतिवाक्यें आत्म्याचें स्वप्रकाशत्व सुचवितात. ॥१६॥
येनेदं जानते सर्वं तं केनान्येन जानताम् ।
विज्ञातारं केन विद्याच्छक्तं वेद्ये तु साधनम् ॥ १७ ॥
आणखी दुसरीही अशींच प्रमाणें आहेत. जेणेंकरून हें सर्व जग जाणते त्या आत्म्याला जाणण्यास कोण समर्थ आहे ? अरे, हा जो सर्व जगाचा साक्षी याला कोण जाणूं शकेल ? मनानें याला जाणतां येईल अशी कोणी शंका घेईल, तर याजवर आमचें हेंच सांगणे कीं, आत्मा खेरीज करून बाकीच्या सर्व पदार्थांस जाणण्यास मात्र मन समर्थ आहे. परंतु मनाचाही साक्षी जो आत्मा त्याला जाणण्यास तें कधीं समर्थ होणार नाही. ॥१७॥
स वेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता ।
विदिताविदिताभ्यां तत्पृथक्बोधस्वरूपकम् ॥ १८ ॥
तसेंच, आणखीही दोन प्रमाणें तुला सांगतो. “जें जाणण्यास. योग्य आहे, तें सर्व तो जाणतो.” ”त्याला जाणणारा दुसरा कोणीच नाहीं. तें ब्रह्म ज्ञात पदार्थ आणि अज्ञात पदार्थ यांहून अगदीं भिन्न असून केवळ बोधस्वरूप आहे.” ॥१८॥
बोधेऽप्यनुभवो यस्य न कथंचन जायते ।
तं कथं बोधयेच्छास्त्रं लोष्टं नरसमाकृतिम् ॥ १९ ॥
शि०- ज्ञात आणि अज्ञात पदार्थांखेरीज बोध म्हणून जो तुम्ही म्हणतां तो तरी अनुभवास कोठे येतो ? गु०- घटादिकाच्या बोधाविषयीं अनुभव प्रत्यक्ष होत असून जो मनुष्य तसा अनुभव नाहीं म्हणतो, त्याला मनुष्य तरी कसें म्हणावें ? तो केवळ मनुष्याच्या आकृतीचा पाषाणच आहे, असें म्हटलें पाहिजे. अशा दगडाला शास्त्रानें बोध तरी कसा करावा ? ॥१९॥
जिह्वा मेऽस्ति न वेत्युक्तिर्लज्जायै केवलं यथा ।
न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृषी ॥ २० ॥
अरे, मला जिव्हा आहे कीं नाहीं असें जर कोणी पुसेल, तर तें पुसणें केवळ लाजिरवाणें आहे. कारण, जिव्हेवांचून तसें पुसता कसें येईल ? त्याप्रमाणें बोधाचा मला अनुभव नाहीं असे म्हणणें देखील मूढपणाचें नव्हे काय ? शि०- बरें आपण म्हणतां तसेंच कां होईना. परंतु प्रस्तुत जें आमचें ब्रह्मज्ञानाचे बोलणे चाललें आहे, त्याची सिद्धता कशी झाली ? ॥२०॥
यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ।
यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत्येवं धीर्ब्रह्मनिश्चयः ॥ २१ ॥
गु०- अरे, या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचें ज्ञान होतें, त्या त्या पदार्थाची उपेक्षा करून बाकी राहिलेलें जें केवळ ज्ञान तेंच ब्रह्म व असें जें पक्के समजणें त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ॥२१॥
पञ्चकोषपरित्यागे साक्षिबोधावशेषतः ।
स्वस्वरूपं स एव स्याच्छून्यत्वं तस्य दुर्घटम् ॥ २२ ॥
शि०- जर घटादिविषयांची उपेक्षा करून ब्रह्मनिश्वय करतां येतो, तर पंचकोशविवेक जो तुझीं सांगितला त्याचा उपयोग काय ? गु०- त्याचा उपयोग फार आहे; नाहीं कसा. ब्रह्माच्या प्रत्यग् रूपाच्या ज्ञानांवाचून संसारनिवृत्ति होत नाहीं; व तसें ज्ञान पंचकोशांच्या विवेकांवाचून होत नाहीं. याकरतां तो विवेक अवश्य आहे. अन्नमयादि पंचकोशांचा बुद्धीने त्याग करून बाकी राहिलेला जो त्याचा साक्षी, तोच स्वस्वरूप ब्रह्म आहे, तो जरी दिसत नाहीं तरी त्याचें अस्तिस्व नाहींसे करतां येत नाहीं. म्हणून त्याला कोणच्याही रीतीनें शून्यत्व संभवत नाहीं. ॥२२॥
अस्ति तावत्स्वयं नाम विवादाविषयत्वतः ।
स्वस्मिन्नपि विवादश्चेत्प्रतिवाद्यत्र को भवेत् ॥ २३ ॥
कारण स्वयं म्हणून कोणी तरी एक असलाच पाहिजे. त्याच्या अस्तित्वाविषयींच जर विवाद असेल तर तेथें प्रतिवादी कोणी व्हावें. ॥२३॥
स्वासत्त्वन्तु न कस्मैचिद्रोचते विभ्रमं विना ।
अतएव श्रुतिर्बाधं ब्रूते चासत्त्ववादिनः ॥ २४ ॥
शि०- आपलें नास्तित्व प्रतिपादन करणाराच येथें प्रतिवादी समजावा. गु०- आपण नाहीं, असें भ्रांतिष्टावांचून कोणीही कबूल करणार नाहीं, म्हणूनच श्रुतीनेंही असत्त्ववाद्यांचा निषेध केला. ॥२४॥
असद्ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेदसन् ।
अतोऽस्य माभूद्वेद्यत्वं स्वसत्त्वन्त्वभ्युपेयताम् ॥ २५ ॥
शि०- ती श्रुति कोणती ? गु०- त्या श्रुतीचा अर्थ असा कीं, ”ब्रह्म नाहीं म्हणणारा आपणच नाहीं असें म्हणतो, असें होतें. कारण, आपलें स्वरूप ब्रह्मच आहे.” याकरितां साक्षीला जरी वेद्यत्व नसलें, तरी त्याचें अस्तित्व म्हणून कबूल केलें पाहिजे. ॥२५॥
कीदृक्तर्हीति चेत्पृच्छेदीदृक्ता नास्ति तत्र हि ।
यदनीदृगतादृक्च तत्स्वरूपं विनिश्चिनु ॥ २६ ॥
शि०- मग तर आत्मा कसा आहे तो कृपा करून सांगा. गु०- आत्मा अमुकच प्रकारचा आहे असें सांगतांच येत नाही. ”जो असाही नव्हे, व तसाही नव्हे तोच तुझा आत्मा.” कारण जो पदार्थ ज्ञानाला विषय आहे, तोच पदार्थ असा किंवा तसा आहे असे सांगतां येईल; परंतु आत्मा हा ज्ञानाला विषय मुळींच नाहीं; तेव्हां तो असा कीं तसा हें कसें सांगावे. ॥२६॥
अक्षाणां विषयस्त्वीदृक्परोक्षस्तादृगुच्यते ।
विषयो नाक्षविषयः स्वत्त्वान्नास्यपरोक्षता ॥ २७ ॥
शि०- आपल्या बोलण्याचा अभिप्राय नीट समजला नाहीं. तो स्पष्ट करून सांगा. गु०- घटादिक जे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ त्यांस आम्ही अशा प्रकारचे असें म्हणतों, व जे इंद्रियांआड असणारे पदार्थ त्यांस आम्ही तशा प्रकारचे असें म्हणतों. आतां आत्मा हा इंद्रियांस विषयच नाहीं म्हणून तो असा (इदृश) असें म्हणतां येत नाहीं, व तो स्वप्रकाश, स्वसंवेद्य असल्यामुळें तो तसा (तादृश) असेही म्हणतां येत नाहीं. ॥२७॥
अवेद्योऽप्यपरोक्षोऽतः स्वप्रकाशो भवत्ययम् ।
सत्यं ज्ञानमनन्तं चेत्यस्तीह ब्रह्मलक्षणम् ॥ २८ ॥
या कारणास्तव आत्मा ज्ञानाला विषय नसून प्रत्यक्ष आहे. म्हणूनच तो स्वप्रकाश आहे. व ”सत्यं ज्ञानमनंतं” या श्रुतीने जें ब्रह्माचें लक्षण सांगितलें तें आत्म्यालाही लागूं पडतें. कारण आत्माही सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत आहे असें विचाराअंतीं सिद्ध होतें. ॥२८॥
सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः ।
बाधः किंसाक्षिको ब्रूहि न त्वसाक्षिक इष्यते ॥ २९ ॥
शि०- तें कसें ? गु०- ज्याला बाध नाहीं तेंच सत्य. आत्मा सर्व जगाच्या अभावाचा साक्षी आहे, त्याच्या अभावाला पहाणारा कोणीच नाहीं, व पहाणारावांचून तदभाव स्वीकारणें बरोबर नाहीं. म्हणून आत्मवस्तूचा अभाव कधींही होत नाहीं असें म्हटलें पाहिजे. सर्व जगाच्या अभावाचा अनुभव निद्रा, मूर्च्छा व समाधि या अवस्थांमध्ये सर्वांस आहेच. तसा साक्षीच्या अभावाचा अनुभव घेणारा कोणीही नाहीं, म्हणून आत्मा हा सत्य आहे हे सिद्ध झालें. ॥२९॥
अपनीतेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते वियत् ।
शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते यत्तदेव तत् ॥ ३० ॥
यास दृष्टांत. घरांतील सर्व मूर्त पदार्थ काढून टाकले असतां जसें बाकी अमूर्त आकाश रहातें, त्याप्रमाणें आपणाव्यतिरिक्त जितके म्हणून देहेंद्रियादिक मूर्तामूर्त पदार्थ आहेत, त्यांचें ”नेतिनेति” या श्रुतीने निराकरण करून बाकी जो बोधरूप साक्षी रहातो तोच बाधरहित सत्य आत्मा होय. ॥३०॥
सर्वबाधे न किंचिच्चेद्यन्न किंचित् तदेव तत् ।
भाषा एवात्र भिद्यन्ते निर्बाधं तावदस्ति हि ॥ ३१ ॥
शि०- प्रतीतीस येणार्या सर्व पदार्थांचा निषेध केला असतां बाकी कांहींच रहात नाही. मग बाकी जो रहातो तो आत्मा असें जें आपण म्हटले त्याचा अर्थ काय ? गु०- जें बाकी कांहीं रहात नाहीं म्हणतोस, तेंच आमचें ब्रह्म. कांहीं नाहीं म्हणणें व कांहीं आहे म्हणणें ह्यांत भाषेचा मात्र भेद आहे. येर्हवी वास्तविक पाहिलें असतां बाधरहित साक्षिचैतन्य आहेच आहे. ॥३१॥
अत एव श्रुतिर्बाध्यं बाधित्वा शेषयत्यदः ।
स एष नेति नेत्यात्मेत्यतद्व्यावृत्तिरूपतः ॥ ३२ ॥
श्रुतीमध्येही असेंच सांगितले आहे. ”नेतिनेति” या श्रुतीचा अर्थ असा आहे कीं, जे जे पदार्थ बुद्ध्यादिकांस गोचर म्हणून आहेत, ते ते जड असें समजून त्यांचें निराकरण करून बाकी राहिलेलें साक्षिचैतन्य जें निराकरण करण्यास अशक्य तेंच ब्रह्म होय. ॥३२॥
इदं रूपं तु यद्याव तत्त्यक्तुं शक्यतेऽखिलम् ।
अशक्यो ह्यनिदं रूपः स आत्मा बाधवर्जितः ॥ ३३ ॥
शि०- “नेतिनेति” या श्रुतीने बाधित होणारा पदार्थ कोणता व बाधित न होणारा पदार्थ कोणता ? गु०- जितके म्हणून हें हें अशा दर्शक नामास गोचर होणारे पदार्थ आहेत, त्यांचा निषेध करणें शक्य आहे. आणि जी वस्तु, ही अमुकच अशा रीतीनें दाखवितां येत नाहीं; तिचा निषेध करणे अशक्य आहे, अशी वस्तु सर्वांचा साक्षी जो बाधवर्जित आत्मा तो एकच आहे. ॥३३ ॥
सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरोदितम् ।
स्वयमेवानुभूतित्वादित्यादिवचनैः स्फुटम् ॥ ३४ ॥
याप्रमाणें ब्रह्माच्या लक्षणांत जे सत्यत्व सांगितले तें आत्म्यास कसे लागूं पडते तें येथें सिद्ध करून दाखविले. आत्म्याची ज्ञानरूपता तर ”स्वयमेवानुभूतित्वात्” इत्यादि श्वोकांतील वाक्यांनीं पूर्वीच सिद्ध केली आहे. शि०- सत्य आणि ज्ञान ही दोन लक्षणे आत्म्याचेठायीं सिद्ध करून दाखविली खरी, परंतु अनंत हें लक्षण आत्म्यास लागू पडेल कीं नाहीं, याचाच मला मुळीं संशय आहे. ॥३४॥
न व्यापित्वाद्देशतोऽन्तो नित्यत्वान्नापि कालतः ।
न वस्तुतोऽपि सर्वात्म्यादानन्त्यं ब्रह्मणि त्रिधा ॥ ३५ ॥
गुरु०- तें कसे लागू पडत नाहीं ? अरे, ब्रह्म सर्वव्यापि असें श्रुतींत सांगितले आहे, यावरून अर्थातच त्याला देशपरिच्छेद नाहीं; ब्रह्म नित्य असें सांगितले आहे म्हणून त्यास कालपरिच्छेद नाहीं; अणि ब्रह्म सर्व जगाचा आत्मा असें सांगितलें आहे म्हणून त्यास वस्तुपरिच्छेदही नाहीं. याप्रमाणें देशतः, कालतः व वस्तुतः ब्रह्मास अंत नाहीं असें झालें ॥३५॥
देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया ।
न देषादिकृतोऽन्तोऽस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटन्ततः ॥ ३६ ॥
शि०- देश, काल आणि वस्तु ही तिन्ही प्रत्यक्ष असून त्यांचा परिच्छेद ब्रह्मास नाहीं असें कसे म्हणतां ? गु०- असेनात बापडी. तीं असलीं तरी मायाकल्पित मिथ्या असल्यामुळे त्यांपासून ब्रह्माच्या अनंतपणास मुळीच हानि नाहीं. म्हणून ब्रह्म अनंत आहे असें जें म्हटले तें अगदीं योग्य आहे. ॥२६॥
सत्यं ज्ञानमनन्तं यद्ब्रह्म तद्वस्तु तस्य तत् ।
ईश्वरत्वन्तु जीवत्वमुपाधिद्वयकल्पितम् ॥ ३७ ॥
शि०- अहो, ब्रह्माला जड जगताचा परिच्छेद नाहीं असें म्हटलें तरी चेतनरूप जे जीव आणि ईश्वर त्यांचा तरी परिच्छेद असलाच पाहिजे. मग ब्रह्म अनंत आहे, हें म्हणणें कसें संभवेल. गु०- जें सत्यादि लक्षणांनीं युक्त असें ब्रह्म सांगितले तेवढे मात्र सत्य आहे. त्याजवर ईश्वरत्व आणि जीवत्व ही दोन्ही उपाधिकल्पित आहेत; म्हणून जड जगताप्रमाणें त्यांपासनूही ब्रह्मास परिच्छेद होत नाहीं ॥३७॥
शक्तिरस्त्यैश्वरी काचित्सर्ववस्तुनियामिका ।
आनन्दमयमारभ्य गूढा सर्वेषु वस्तुषु ॥ ३८ ॥
शि०- त्या दोन्ही उपाधीची स्वरूपे कृपा करून सांगावी. गु०- पृथिव्यादि सर्व वस्तूंचे नियमन करणारी अशी कोणी एक ईश्वराची अनिर्वचनीय शक्ति आहे. शि०- तर मग ती कां दिसत नाहीं. ? गु०- आनंदमयापासून सर्व ब्रह्मांडापर्यंत ती गुप्तरूपानें आहे म्हणून दिसत नाही. ॥३८॥
वस्तुधर्मा नियम्येरं शक्त्या नैव यदा तदा ।
अन्योन्यधर्मसांकर्याद्विप्लवेत जगत्खलु ॥ ३९ ॥
शि०- ती जर दिसत नाहीं तर ती आहे असें तरी कसे म्हणावे ? गु०- ती जर नसेल तर पृथिव्यादि तत्त्वांचे जे काठिन्यादि धर्म त्यांची व्यवस्थाच लागणार नाहीं इतकेंच नव्हे, तर त्या धर्माचें परस्पर सांकर्य होऊन जगाची स्थितीच राहणार नाही. ॥३९॥
चिच्छायावेशतः शक्तिश्चेतनेव विभाति सा ।
तच्छक्त्युपाधिसंयोगाद्ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत् ॥ ४० ॥
शि०- परंतु ती जड आहे असें तुम्हीच म्हणतां, मग ती जगाचें नियमन तरी कसें करील. गु०- ती जरी जड आहे तरी तिजमध्य ब्रह्माचें प्रतिबिंब पडल्यामुळे ती चेतनासारखी दिसते, म्हणून तिजमध्यें नियमन करण्याचे सामर्थ्यही संभवतें. या शक्तीच्या उपाधीचा संयोग झाल्यामुळे ब्रह्मालाच ईश्वरपणा आला. ॥४०॥
कोषोपाधिविवक्षायां याति ब्रह्मैव जीवताम् ।
पिता पितामहश्चैकः पुत्रपौत्रौ यथा प्रति ॥ ४१ ॥
आणि पूर्वी सांगितलेल्या कोशांच्या उपाधीमुळे ब्रह्मालाच जीवपणा आला. शि०- अहो पण एकाच ब्रह्माला जीवत्व आणि ईश्वरत्व हे विरुद्ध धर्म कसे आले ? गु०- जसा एकच मनुष्य पुत्राच्या विवक्षेनें पिता होतो, आणि नातवाच्या विवक्षेनें पितामह म्हणजे आजा होतो; त्याप्रमाणें एकच ब्रह्म कोशविवक्षेनें जीव होतें, आणि मायेच्या विवक्षेनें ईश्वर होतें. ॥४१॥
पुत्रादेरविवक्षायां न पिता न पितामहः ।
तद्वन्नेशो नापि जीवः शक्तिकोषाविवक्षणे ॥ ४२ ॥
परंतु पुत्र आणि नातु यांची विवक्षा न घेतल्यास जसा बापही नाहीं व आजाही नाही, त्याप्रमाणे माया व कोश यांची विवक्षा न केली तर ईश्वरही नाहीं व जीवही नाहीं. ॥४२॥
य एवं ब्रह्म वेदैष ब्रह्मैव भवति स्वयम् ।
ब्रह्मणो नास्ति जन्मातः पुनरेष न जायते ॥ ४३ ॥
इति पञ्चकोषोविवेकोनाम तृतीयः परिच्छेदः ॥ ३ ॥
या रीतीनें जो ब्रह्म जाणतो तो स्वत: ब्रह्मच होतो. आतां ज्या अर्थी ब्रह्माला जन्म नाही, त्या अर्थीं त्यालाही पुनजर्न्म नाहीं हें सिद्ध झालें. ॥४३॥
इति पंचकोशविवेकः समाप्तः ।