पंचदशी – प्रकरण ११ – ब्रह्मानन्दे योगानन्दः
ब्रह्मानन्दं प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन्नशेषतः ।
ऐहिकामुष्मिकानर्थव्रातं हित्वा सुखायते ॥ १ ॥
ब्रह्मवित्परमाप्नोति शोकं तरति चात्मवित् ।
रसो ब्रह्मरसं लब्ध्वाऽऽनन्दी भवति नान्यथा ॥ २ ॥
प्रतिष्ठां विन्दते स्वस्मिन् यदा स्यादथ सोऽभयः ।
कुरुतेऽस्मिन्नन्तरं चेदथ तस्य भयं भवेत् ॥ ३ ॥
वायुः सूर्यो वह्निरिन्द्रो मृत्युर्जन्मान्तरेऽन्तरम् ।
कृत्वा धर्मं विजानन्तोऽप्यस्माद्भीत्या चरन्ति हि ॥ ४ ॥
आनन्दं ब्रह्मणो विद्वान्न बिभेति कुतश्चन ।
एतमेव तपेन्नैषा चिन्ता कर्माग्निसम्भृता ॥ ५ ॥
एवं विद्वान्कर्मणि द्वे हित्वाऽऽत्मानं स्मरेत्सदा ।
कृते च कर्मणि स्वात्मरूपेणैवैष पश्यति ॥ ६ ॥
भिद्यते हृदयग्रन्थिश्च्छिन्द्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥ ७ ॥
तमेव विद्वानत्येति मृत्युं पन्था न चेतरः ।
ज्ञात्वा देवं पाशहानिः क्षीणैः क्लेशैर्न जन्मभाक् ॥ ८ ॥
देवं मत्वा हर्षशोकौ जहात्यत्रैव धैर्यवान् ।
नैनं कृताकृते पुण्यपापे तापयतः क्वचित् ॥ ९ ॥
इत्यादिश्रुतयो बह्व्यः पुराणैः स्मृतिभिः सह ।
ब्रह्मज्ञानेऽनर्थहानिमानन्दं चाप्यघोषयन् ॥ १० ॥
एथपर्यंत विवेकपंचक आणि दीपपंचक असे दोन भाग झाले. आतां या भागांत पांच प्रकारचे आनंद सांगितले आहेत. त्यांपैकी ब्रह्मानंदाचें विवेचन आम्ही या प्रकरणांत करणार म्हणून यास ब्रह्मानंद असें नाव आम्ही ठेवतों. त्याचें चांगले ज्ञान झालें असतां या लोकींचे व परलोकींचे जे अनर्थ आहेत त्यापासून मुक्त होऊन मनुष्य आनंदरूप ब्रह्मच होतो. ॥ १ ॥
यास श्रुतीचे प्रमाण ब्रह्मवेत्त्यास परब्रह्माची प्राप्ति होते. आत्मवेत्ता शोकसागरांतून तरून जातो. हा आत्मा एक आनंदरसच आहे यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाहीं. तो मिळाला तरच प्राणी आनंदी होतो त्यावांचून होणार नाहीं. ॥ २ ॥
सद्गुरुकृपेनें जेव्हां यास ब्रह्मस्थिति प्राप्त होते तेव्हां तो भयरहित होतो, आणि त्यांत अंतर पडल्यास त्याला भय प्राप्त होतें. ॥ ३ ॥
“भीषास्माद्वातः पवते” या श्रुतीचाही अभिप्राय हाच आहे. तो असा कीं, वायु, सूर्य, वन्हि, इंद्र व मृत्यु ह्या ज्या पांच नियामक देवता, धर्म चांगला जाणत असूनही त्यांनीं जन्मांतरी ब्रह्मास भेददृष्टीने पाहिल्यामुळें त्याच्या भीतीनेंच आपली कामे बजावीत आहेत. ॥ ४ ॥
ब्रह्मानंद जाणणाऱ्या पुरुषाला कशाचीही भीति नाहीं. कारण भीतीला दुसरी वस्तु असली पाहिजे. परंतु तो ब्रह्मानंद अद्वैत आहे म्हणून तेथें भीतीस जागाच उरली नाहीं. अमुक पुण्य केलें नाहीं, अमुक पाप मीं केलें अशी जी कर्मजाड्याापसून होणारी चिंता ती त्यास मात्र बाधत नाहीं. इतर म्मूढांस बाधते. ॥ ५ ॥
याप्रमाणे तो तत्त्ववेत्ता पुण्यपापरूप दोन्ही कर्मांचा मिथ्यात्व अनुसंधानाने त्याग करून आत्म्याचेच स्मरण करीत बसतो. तीं केलेली पुण्यपापे आत्मरूपेंकरून तो पहातो. ॥ ६ ॥
कल्पाची कल्पे जरी गेली तरी कर्माचा क्षच भोगावांचून होतच नाहीं, असें शास्त्र आहे. त्यावरून पूर्वजन्मीची जी कांहीं अप्रसिद्ध कर्में आहेत त्यांचा क्षय केवल आत्मानुसंधानानें कसा होईल ? तो न झाल्यास चिंता तरी कशी जाईल. अशी शंका कोणाची असेल तर त्यास आम्ही हे मुंडकश्रुतीचे प्रमाण देतो. तिचा अभिप्राय असा की, पर म्हणजे हिरण्यगर्भादि ब्रह्मदेव ज्यापासून असें ब्रह्म त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला असतां हृदयाची ग्रंथी म्हणजे अन्योन्याध्यास नाहीसा होतो. आत्मा देहापासून निराळा आहे कीं नाहीं इत्यादि सर्व संशय पळून जातात. अणि सर्व पापपुण्यरूप जी कर्में त्यांचें कारण अज्ञान नष्ट झाल्यामुळे क्षय पावतात. ॥ ७ ॥
जन्मममृत्यु तरण्यास ज्ञानावांचून दुसरा मार्गच नाहीं. अशाविषयी श्वेताश्वतर शाखेमध्ये प्रमाण आहे. त्याचा अभिप्राय असा कीं, पूर्वोक्त आत्म्यास जाणणारा पुरुष मृत्यूस अतिक्रमून जातो. ज्ञानावाचून दुसरा मार्ग नाहीं. ब्रह्मज्ञान झालें असतां कामक्रोधादिक पाशाची हानी होते. हे पाश क्षीण झाले असताही पुनर्जन्म होत नाहीं. ॥ ८ ॥
ज्ञानी शोकाने तरून जातो असें म्हटलें त्यास आणखी एक दुसरे प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा आहे कीं, ब्रह्मज्ञान झाले असतां धीर पुरुषाचे हर्षशोक जातात. मग त्याचें हातून पापे घडली आणि मुळें घडली नाहीत तरी त्याला ताप मुळीच होत नाहीं. ॥ ९ ॥
याप्रेमाणे ब्रह्मज्ञान झाले असतां अनर्थाची हानी होऊन आनंद प्राप्त होतो म्हणण्याविषयी पुष्कळ श्रुति स्मृति पुराणांचा डंका वाजत आहे. ॥ १० ॥
आनन्दस्त्रिविधो ब्रह्मानन्दो विद्यासुखं तथा ।
विषयानन्द इत्यादौ ब्रह्मानन्दो विविच्यते ॥ ११ ॥
भृगुः पुत्रः पितुः श्रुत्वा वरुणाद्ब्रह्मलक्षणम् ।
अन्नप्राणमनोबुद्धिस्त्यक्त्वाऽऽनन्दं विजज्ञिवान् ॥ १२ ॥
आनन्दादेव भूतानि जायन्ते तेन जीवनम् ।
तेषां लयश्च तत्रातो ब्रह्मानन्दो न संशयः ॥ १३ ॥
भूतोत्पत्तेः पुरा भूमा त्रिपुटीद्वैतवर्जनात् ।
ज्ञातृज्ञानज्ञेयरूपा त्रिपुटी प्रलये हि न ॥ १४ ॥
विज्ञानमय उत्पन्नो ज्ञाता ज्ञानं मनोमयः ।
ज्ञेयाः शब्दादयो नैतत्त्रयमुत्पत्तितः पुरा ॥ १५ ॥
त्रयाभावे तु निर्द्वैतः पूर्ण एवानुभूयते ।
समाधिसुप्तिमूर्च्छासु पूर्णः सृष्टेः पुरा तथा ॥ १६ ॥
यो भूमा स सुखं नाल्पे सुखं त्रेधा विभेदिनि ।
सनत्कुमारः प्राहैवं नारदायातिशोकिने ॥ १७ ॥
सपुराणान् पञ्च वेदान् शास्त्राणि विविधानि च ।
ज्ञात्वाऽप्यनात्मवित्त्वेन नारदोऽतिशुशोच ह ॥ १८ ॥
वेदाभ्यासात्पुरा तापत्रयमात्रेण शोकिता ।
पश्चात्त्वभ्यासविस्मारभङ्गगर्वैश्च शोकिता ॥ १९ ॥
सोऽहं विद्वान्प्रशोचामि शोकपारं नयस्व माम् ।
इत्युक्तः सुखमेवास्य पारमित्यभ्यधादृषिः ॥ २० ॥
आनंद तीन प्रकारचा. ब्रह्मानंद, विद्यानंद आणि विषयानंद. त्यांपैकीं ब्रह्मानंदाचे विवेचन प्रथमतः करतो. ॥ ११ ॥
ब्रह्म हे आनंदरूपच आहे अशाविषयी तैत्तिरीय श्रुतीचे प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा कीं, -भृगुनें आपला पिता जो वरुण त्यापासून ब्रह्मलक्षण समजून घेऊन अन्न, प्राण, मन आणि विज्ञान या चार कोशांचा त्याग करून आनंदमय कोश हाच ब्रह्म आहे असें जाणता झाला. ॥ १२ ॥
कारण त्याला ब्रह्माचीं पुढें सांगितलेली सर्व लक्षणे लागतात. ज्याच्यापासून सर्व भूते होतात तें ब्रह्म. एथेही अमृतानंदापासून सर्व प्राणी होतात. जेणेकरून सर्व प्राणी वाचतात तें ब्रह्म या आनंदानेंही सर्व प्राणी वाचतात. कारण विषयोपभोगावाचून वाचणे नाहीं. आणि त्यावाचून आनंद नाहीं. जेथे सर्वांचा लय होतो तें ब्रह्म. या आनंदांतही जीवांचा लय होतो. याचा अनुभव सुषुप्तींत सर्वांस आहे. म्हणून आनंदच ब्रह्म आहे असें सिद्ध केलें. ॥१३ ॥
ब्रह्माला आनंदरूपता आहे एतद्विषयी छांदोग्य श्रुतीचेही प्रमाण आहे. त्याचा भावार्थ असा कीं, आकाशादि पंचभूतांच्या उत्पत्तीपूर्वी ज्ञातृज्ञानज्ञेय त्रिपुटीरूप द्वैत मुळींच नव्हतें. केवळ एक व्यापक आत्माच होता. कारण प्रलयकाळीं ती त्रिपुटी नाहीं असा वेदांत सिद्धांत आहे. ॥ १४॥
कारण परमात्म्यापामन उत्पन्न झालेला विज्ञानमय जो जीव तोच ज्ञाता, मन हेंच ज्ञान आणि बाकीचे सारे शब्दादिक विषय हे ज्ञेय होत. तेव्हां ही त्रिपुटी मिळून सर्व जग झालें. मग त्याचे उत्पत्तीचे पूर्वी ती त्रिपुटी नव्हती हें कांहीं सागावयास नको.॥ १५ ॥
तिहींचा अभाव झाला असतां आत्मा आपण अद्वैत परिपूर्ण राहतो. याचा अनुभव ज्ञान्यास समाधीत, आणि इतर लोकांस सुषुप्ति व मूर्च्छा या अवस्थेंत आहे. म्हणून सृष्टिपूर्वीही या त्रिपुटीचा अभाव असल्यामुळें तो आत्मा तसाच असला पाहिजे. ॥ १६॥
त्रिपुटीच्या अभावीं पूर्ण आत्मा राहतो असें सांगितलें, तेवढ्यावरून तो आनंदरूप कसा ठरतो अशी कोणी शंका घेण्याचे कारण नाहीं. कारण नारदास फार शोक झाला असतां सनत्कुमाराने असें सांगितलें कीं, “बाबारे, जें भूमा म्हणजे पूर्ण आहे, तेंच सुखरूप आहे. या त्रिपुटीने परिच्छिन्न झालेल्या अल्पामध्यें मुळींच सुख नाहीं.” ॥ १७ ॥
नारदास शोक होण्याचें कारण हेंच कीं, पुराणांसहित पांच वेद व अनेक प्रकारची सर्व शास्त्रे जाणूनही आत्मज्ञान त्यास झालें नाहीं. ॥ १८ ॥
वेदाभ्यास होण्यापूर्वी केवळ त्रिविधतापाचाच शोक होतो. नंतर अभ्यासाचे श्रमाचा शोक, विस्मरणाचा शोक, दुसऱ्यांनी केलेल्या तिरस्काराचा शोक, बरें, कदाचित् चांगले अध्ययन झालें तर गर्वाचा पुनः शोक आहेच. ॥ १९ ॥
नारदास अति शोक झालेला त्यानें सनत्कुमारास केलेल्या पुढील प्रश्नावरून समजून येतो. नारद म्हणतो महाराज, मला फार शोक होत आहे, यापासून मला पार करा. सनत्कुमार म्हणाला, बाबारे, यापासून पार होण्यास सुख म्हणजे काय हें समजले पाहिजे. ॥ २० ॥
सुखं वैषयिकं शोकसहस्रेणावृतत्वतः ।
दुःखमेवेति मत्वाह नाल्पेऽस्ति सुखमित्यसौ ॥ २१ ॥
ननु द्वैते सुखं माभूदद्वैतेऽप्यस्ति नो सुखम् ।
अस्ति चेदुपलभ्येत तथा च त्रिपुटी भवेत् ॥ २२ ॥
मास्त्वद्वैते सुखं किन्तु सुखमद्वैतमेव हि ।
किं मानमिति चेन्नास्ति मानाकाङ्क्षा स्वयंप्रभे ॥ २३ ॥
स्वप्रभत्वे भवद्वाक्यं मानं यस्माद्भवानिदम् ।
अद्वैतमभ्युपेत्यास्मिन्सुखं नास्तीति भाषते ॥ २४ ॥
नाभ्युपैम्यहमद्वैतं त्वद्वचोऽनूद्य दूषणम् ।
वच्मीति चेत्तदा ब्रूहि किमासीद्द्वैततः पुरा ॥ २५ ॥
किमद्वैतमुत द्वैतमन्यो वा कोटिरन्तिमः ।
अप्रसिद्धो न द्वितीयोऽनुत्पत्तेः शिष्यतेऽग्रिमः ॥ २६ ॥
अद्वैतसिद्धिर्युक्त्यैव नानुभूत्येति चेद्वद ।
निर्दृष्टान्ता सदृष्टान्ता वा कोट्यन्तरमत्र नो ॥ २७ ॥
नानुभूतिर्न दृष्टान्त इति युक्तिस्तु शोभते ।
सदृष्टान्तत्वपक्षे तु दृष्टान्तं वद मे मतम् ॥ २८ ॥
अद्वैतः प्रलयो द्वैतानुपलम्भेन सुप्तिवत् ।
इति चेत्सुप्तिरद्वैतेत्यत्र दृष्टान्तमीरय ॥ २९ ॥
दृष्टान्तः परसुप्तिश्चेदहो ते कौशलं महत् ।
यः स्वसुप्तिं न वेत्त्यस्य परसुप्तौ तु का कथा ॥ ३० ॥
तें खरें सुख विषयांपासून होत नाहीं. विषयांपासून होणारे सुख विषयुक्त अन्नाप्रमाणें हजारों दुःखानी वेडलेले असल्यामुळें तें दुःख समजले पाहिजे. अशा अभिप्रायानेंच त्रिपुटीमध्यें सुख नाहीं, असें सनत्कुमारानें सांगितलें. ॥ २१ ॥
याजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, द्वैतांत सुख नाहीं हें आम्हांस कबूल; पण तुमच्या अद्वैतांत तरी तें कुठे आहे ? जर आहे म्हणतांच, तर त्याचा अनुभव असला पाहिजे. आणि अनुभव जर असेल तर अनुभव घेणारा, आणि अनुभव घेण्याची वस्तु, ही दोन्ही असलीं पाहिजेत. तीं दोन घेतली म्हणजे पुनः त्रिपुटी येऊन अद्वैतहानि झालीच. ॥ २२ ॥
याचे उत्तर आम्ही असें देतो कीं, अद्वैत निराळेंच असून त्यात निराळें सुख आहे असें आमचे म्हणणे मुळींच नाहीं. कारण अद्वैत हेंच स्वतः सुख आहे. ही गोष्ट इतकी प्रत्यक्ष आहे कीं, तिला दुसऱ्या प्रमाणांची जरूर नाहीं. कारण तें स्वयंप्रकाश आहे. ॥ २३ ॥
त्याच्या स्वयंप्रकाशत्वाविषयीं अद्वैतांत सुख नाहीं म्हणणाराचे वाक्यच प्रमाण आहे. कारण, तो जेव्हां वाक्य बोलला तेव्हां अद्वैतांत सुख आहे किंवा नाहीं एवढीच मात्र त्यांस शंका आहे. पण अद्वैताच्या अस्तित्वाविषयी त्याला शंकाच असल्याचें दिसत नाहीं. तेव्हां प्रमाणावाचून त्याला अद्वैत भासले असें ठरतें. ॥ २४ ॥
आतां याजवर जो प्रश्न येणार तो आम्हांस माहितच आहे. तो असा कीं, आम्ही तुमचे अद्वैताचा अनुभव कबूल करीत नाहीं. अद्वैतांत सुख नाहीं असे जे म्हटले ते तुमचेच वाक्य, घेऊन म्हटलें ! तर याजवर आम्ही, असे विचारतो, द्वैताचे पूर्वी काय होते ते त्यांनींच सांगावे. ॥ २५ ॥
अद्वैत होतें. कीं द्वैत, होतें किंवा दोन्हीवाचून तिसरा कांहीं प्रकार होता. तिसरा प्रकार तर मुळींच संभवत नाहीं. कारण, अनुभवास येणाऱ्या काय त्या दोन वस्तुच द्वैत किंवा अद्वैत; यावांचून तिसरी गोष्ट मुळीच नाहीं. बरें, तेव्हां द्वैत होते असें जर म्हणावें तर द्वैताच्या पूर्वी द्वैत कसें असेल ? या रीतीनें दोन पक्षांचे खंडन झाल्यावर तिसरा पक्ष जो अद्वैत तो सहजच सिद्ध झाला. ॥ २६ ॥
ही अद्वैत-सिद्धि युक्तीनें सिद्ध करून आमचे तोंड बंद केलें. अनुभवास येत नाहीं असा आरोप पुनः आमचेवर येणारच; तर त्याजवर आम्ही असें विचारतो कीं, ती युक्ति दृष्टांतपूर्वक आहे कीं, अदृष्टांतपूर्वक आहे ? ह्यापैकी एक प्रकार असला पाहिजे. तिसरा प्रकार मुळीच संभवत नाहीं. ॥ २७ ॥
अनुभव तर नाहींच आणि दृष्टांतावांचून तर युक्ति सिद्ध हात नाहीं ? म्हणून युक्तीला दृष्टांत पाहिजे असें झालें. तो दृष्टांत उभय वाद्यांस मान्य असला पाहिजे. असा दृष्टांत कोणचा तो सांगा. ॥ २८ ॥
यास दृष्टांत प्रलयाचाच चांगला आहे. कारण, तेथें द्वैत नाहीं, जेथे द्वैत नाहीं तें अद्वैत. जशी निद्रा. आतां आम्ही पुसतो कीं निद्रा तरी अद्वैत कशावरून ? त्यास, पुनः एक उदाहरण पाहिजे. दुसऱ्याचे निद्रेचे ते उदाहरण देतील तर त्यांचें मोठे पांडित्यच समजले पाहिजे. कारण ज्याला स्वतःची निद्रा समजत नाहीं, त्याला दुसऱ्याची कशी समजेल ? ॥ २९-३० ॥
निश्चेष्टत्वात्परः सुप्तो यथाहमिति चेत्तदा ।
उदाहर्तुः सुषुप्तेस्ते स्वप्रभत्वं बलाद्भवेत् ॥ ३१ ॥
नेन्द्रियाणि न दृष्टान्तस्तथाप्यङ्गीकरोषि ताम् ।
इदमेव स्वप्रभत्वं यद्भानं साधनैर्विना ॥ ३२ ॥
स्तामद्वैतस्वप्रभत्वे वद सुप्तौ सुखं कथम् ।
शृणु दुःखं तदा नास्ति ततस्ते शिष्यते सुखम् ॥ ३३ ॥
अन्धः सन्नप्यनन्धः स्याद्विद्धोऽविद्धोऽथ रोग्यपि ।
अरोगीति श्रुतिः प्राह तच्च सर्वे जना विदुः ॥ ३४ ॥
न दुःखाभावमात्रेण सुखं लोष्टशिलादिषु ।
द्वयाभावस्य दृष्टत्वादिति चेद्विषमं वचः ॥ ३५ ॥
मुखदैन्यविकासाभ्यां परदुःखसुखोहनम् ।
दैन्याद्यभावतो लोष्टे दुःखाद्यूहो न सम्भवेत् ॥ ३६ ॥
स्वकीयसुखदुःखे तु नोहनीये ततस्तयोः ।
भावो वेद्योऽनुभूत्यैव तदभावोऽपि नान्यतः ॥ ३७ ॥
तथा सति स्वसुप्तौ च दुःखाभावोऽनुभूतितः ।
विरोधिदुःखराहित्यात्सुखं निर्विघ्नमिष्यताम् ॥ ३८ ॥
महत्तरप्रयासेन मृदुशय्यादिसाधनम् ।
कुतः सम्पाद्यते सुप्तौ सुखं चेत्तत्र नो भवेत् ॥ ३९ ॥
दुःखनाशार्थमेवैतदिति चेद्रोगिणस्तथा ।
भवत्वरोगिणस्तेतत्सुखायैवेति निश्चिनु ॥ ४० ॥
याजवरही त्याचें उत्तर आहेंच; तें हे कीं, दुसरा निचेष्ट झाला म्हणजे तो निजला असें समजावे. तें तरी कशावरून समजले असें आम्ही विचारणारच. त्याचें उत्तर आपल्या अनुभवावरून दुसऱ्याची निद्रा. तेव्हां अर्थातच स्वप्रभत्व ‘कबूल करणें भाग पडलें. ॥ ३१ ॥
कारण सुषुप्तीचे ज्ञान करून देण्याला इंद्रियादि इतर साधनेही नाहींत, व दृष्टांतही नाहीं. असें असून सुषुप्ती समजली म्हणतात, तेव्हां अर्थातच ती स्वयंप्रकाश असें ठरले. साधनावाचून जें ज्ञान तेंच स्वयंप्रकाश. ॥ ३२ ॥
याप्रमाणे सुषुप्ति अद्वैत असून स्वयंप्रकाश आहे असें सिद्ध झालें; परंतु तेथें सुख आहे किंवा नाही ही अद्यापि शंका राहिलीच. या शंकेचा परिहार हा कीं, जेथे दुःख नाहीं तेथें सुख असलेंच पाहिजे. निद्रेतील दुःखाभावाचा अनुभव सर्वांस आहे. तेव्हां अर्थातच बाकी सुख राहिलें. ॥ ३३ ॥
यास श्रुतीचे प्रमाण असें आहे कीं, निद्रेमध्ये देहाभिमान लीन झाल्यामुळे मनुष्यास आपण आंधळा, जखमी किंवा रोगी असूनही त्याचें भान त्याला काहीच नसते. असा प्रत्येक मनुष्याचा अनुभवही आहे. ॥ ३४ ॥
याजवर कोणी म्हणेल कीं, दुःख नाहीं एवढ्याचमुळें सुखाचे अस्तित्व सिद्ध होत नाहीं. कारण, लोष्टशिलादिकांचे ठायीं त्या दोहींचाही अभाव आहें ? पण हा दृष्टांतच बरोबर नाहीं. ॥ ३५ ॥
कारण, दुसऱ्याचे सुखदुःखाचें जे अनुमान करावयाचें तें केवळ त्याचे मुद्रेवरून. मुद्रा प्रफुल्लित असली तर त्यास सुख झालें आहे, व ती म्लान असली तर दुःख झाले आहे असें समजावयाचे; पण तूं जो लोष्टाचा दृष्टांत दिलास तेथें दुःखादिकाचें अनुमान करण्यास मार्गच नाही. ॥ ३६ ॥
दुसऱ्याचे सुखदुःख असें अनुमानाने समजावयाचे तसें स्वकीय सुखदुःख समजण्यास अस्तित्व जसे अनुभवाने समजते तसा त्यांचा अभावही अनुभवानेच समजतो. दुसऱ्या प्रमाणाची जरूर नाहीं. ॥ ३७ ॥
याकरितां आपल्या निद्रेमधील दुःखाभाव ज्याअर्थी अनुभवाने समजतो त्याअर्थी विरोधि दुःखाच्या अभावामुळे राहिलेले सुख अनुभवास आलेंच पाहिजे. ॥ ३८॥
निद्रेत जर सुख नसेल तर मोठ्या: प्रयासानें मऊ गाद्या गिर्द्या इत्यादिक साधने करण्याच्या खटपटींत मनुष्य कशाला पडता ? ॥ ३९ ॥
तो जी खटपट करतो ती केवळ दुःखनिवारणार्थ; तेथें कांहीं नवीन सुखाची प्राप्ति नाहीं; अशी शंका कोणी घेऊ नये. कारण, ती गोष्ट कदाचित् रोग्याला लागू पडेल. पण धड-धाकड मनुष्य देखील जो इतका त्या साधनार्थ प्रयत्न करतो त्या अर्थीं तो सुखार्थच असला पाहिजे यातसंशय नाहीं. ॥ ४० ॥
तर्हि साधनजन्यत्वात्सुखं वैषयिकं भवेत् ।
भवत्येवात्र निद्रायाः पूर्वं शय्यासनादिजम् ॥ ४१ ॥
निद्रायां तु सुखं यत्तज्जन्यते केन हेतुना ।
सुखाभिमुखधीरादौ पश्चान्मज्जेत्परे सुखे ॥ ४२ ॥
जाग्रद्व्यापृतिभिः श्रान्तो विश्रम्याथ विरोधिनि ।
अपनीते स्वस्थचितोऽनुभवेद्विषये सुखम् ॥ ४३ ॥
आत्माभिमुखधीवृत्तौ स्वानन्दः प्रतिबिम्बति ।
अनुभूयैनमत्रापि त्रिपुट्या श्रान्तिमाप्नुयात् ॥ ४४ ॥
तत्छ्रमस्यापनुत्यर्थं जीवो धावेत्परात्मनि ।
तेनैक्यं प्राप्य तत्रत्यो ब्रह्मानन्दः स्वयं भवेत् ॥ ४५ ॥
दृष्टान्ताः शकुनिः श्येनः कुमारश्च महानृपः ।
महाब्राह्मण इत्येते सुप्त्यानन्दे श्रुतीरिताः ॥ ४६ ॥
शकुनिः सूत्रबद्धः सन् दिक्षु व्यापृत्य विश्रमम् ।
अलब्ध्वा बन्धनस्थानं हस्तस्तम्भाद्युपाश्रयेत् ॥ ४७ ॥
जीवोपाधिर्मनस्तद्वद्धर्माधर्मफलाप्तये ।
स्वप्ने जाग्रति च भ्रान्त्वा क्षीणे कर्मणि लीयते ॥ ४८ ॥
श्येनो वेगेन नीडैकलम्पटः शयितुं व्रजेत् ।
जीवः सुप्त्यै तथा धावेद्ब्रह्मानन्दैकलम्पटः ॥ ४९ ॥
अतिबालः स्तनं पीत्वा मृदुशय्यागतो हसन् ।
रागद्वेषाद्यनुत्पत्तेरानन्दैकस्वभावभाक् ॥ ५० ॥
यावर दुसरी अशी एक शंका आहे कीं, ज्या, सुखास शय्यादिकांचे साधन लागतें तें आत्मसुख कसें होईल ? कारण, आत्ममुख स्वतःसिद्ध आहे. याकरिता तें सुख वैषयिकच असलें पाहिजे. तर आम्ही तरी नाहीं कुठे म्हणतो. श- म्यादि साधनापासूनहोणारे सुख वैषयिकच आहे. ॥ ४१ ॥
परंतु निद्रेमध्यें जें सुख आहे त्याला कोणच्याच साधनाची जरूर नाहीं. आधीं बुद्धीचें तोंड सुखाकडे, होऊन ती परममसुखात निमग्न होते. ॥ ४२ ॥
मनुष्य दिवसभर श्रम करून, दमून जेव्हा मृदु शय्येवर येऊन निजतो तेव्हां श्रमापासून झालेल्या दुःखाचे निवारण होऊन स्वस्थपणे शय्यादि विषयसुखाचा अनुभव घेतो. ॥ ४३ ॥
या विषयसुखाचा अनुभव घेण्यामध्ये देखील श्रमच आहेत. प्रण तो आधीं भासत नाहीं. मृदु शय्येवर निजल्यावर बुद्धि-वृत्ति अन्तर्मुख होऊन त्यामध्यें आत्मानंदाचें प्रतिबिंब पडतें. तोच विषयानंद एथेंही अनुभविता, अनुभाव्यआणि अनुभव अशी त्रिपुटी असल्यामुळें त्याला श्रमच होतो. ॥ ४४ ॥
तो श्रमही त्यास सहन न झाल्यामुळे त्याच्या निवारणार्थ जीव आत्मरूपाकडे धाव घेतो. मग त्याशीं ऐक्य पावून निद्रेमध्यें ब्रह्मानंदच होऊन राहतो. ॥ ४५ ॥
यानिद्रानंदास श्रुतीने पांच दृष्टांत दिले आहेत. एक शकुनीचा, दुसरा श्येनाचा, तिसरा बाळाचा; चवथा सार्वभौम राजाचा आणि पाचवा महाब्रामह्मण जे तत्त्ववेत्ते त्यांचा. ॥ ४६ ॥
शकुनि म्हणून एक पक्षी आहे त्याचे. पायास सूत्र बांधून त्याला उडावयास आकाशात सोडलें असता चोंहोकडे फिरून फिरून कोठेंही विश्रांतिस्थान न मिळाल्यामुळेच्या हाताने तें सूत्र धरले असेल त्या हातावर किंवा ज्या खांबास तें बांधले असेल त्या खांबावर पुनः येऊन विश्रांति घेतो. ॥ ४७ ॥
त्याप्रमाणें जीवोपाधिरूप मन पुण्य-पापाची फले जीं सुखदुःखे त्यांचा अनुभव घेण्याकरिता जाग्रतस्वप्नीं भ्रमण करून कर्मक्षय झाल्यावर आपलें उपादान जें अज्ञान त्यांत लीन होतें. ॥ ४८ ॥
ज्याप्रमाणें स्वेनपक्षी पुष्कळ उडून उडून दमला असतां त्याचें सर्व लक्ष आपल्या घरड्याकडे लागून त्यांत निजावयास तो जाऊ पाहतो, त्याप्रमाणें जीवही सर्व दिवसभर श्रम करून ब्रह्मानंदाविषयी उत्सुक होऊन निद्रेकडे धांव घेतो. ॥ ४९ ॥
अथवा ज्याप्रमाणें तान्हे मूल आईच्या आंगावर पिऊन मऊ हांतरुणावर हसत पडलेले असतें, तेव्हां रागद्वेषाची उत्पत्ति मनामध्ये अद्यापि झाली नसल्यामुळे तो केवळ आनंदाची मूर्तीच होऊन राहतो. ॥ ५० ॥
महाराजः सार्वभौमः संतृप्तः सर्वभोगतः ।
मानुषानन्दसीमानं प्राप्यानन्दैकमूर्तिभाक् ॥ ५१ ॥
महाविप्रो ब्रह्मवेदी कृतकृत्यत्वलक्षणाम् ।
विद्यानन्दस्य परमां काष्ठां प्राप्यावतिष्ठते ॥ ५२ ॥
मुग्धबुद्धातिबुद्धानां लोके सिद्धा सुखात्मता ।
उदाहृतानामन्ये तु दुःखिनो न सुखात्मकाः ॥ ५३ ॥
कुमारादिवदेवायं ब्रह्मानन्दैकतत्परः ।
स्त्रीपरिष्वक्तवद्वेद न बाह्यं नापि चान्तरम् ॥ ५४ ॥
बाह्यं रथ्यादिकं वृत्तं गृहकृत्यं यथान्तरम् ।
तथा जागरणं बाह्यं नाडीस्थः स्वप्न आन्तरः ॥ ५५ ॥
पितापि सुप्तावपितेत्यादौ जीवत्ववारणात् ।
सुप्तौ ब्रह्मैव नो जीवः संसारित्वासमीक्षणात् ॥ ५६ ॥
पितृत्वाद्यभिमानो यः सुखदुःखाकरः स हि ।
तस्मिन्नपगते तीर्णः सर्वान् शोकान भवत्ययम् ॥ ५७ ॥
सुषुप्तिकाले सकले विलीने तमसाऽऽवृतः ।
सुखरूपमुपैतीति ब्रूते ह्याथर्वणी श्रुतिः ॥ ५८ ॥
सुखमस्वाप्समत्राहं नैव किंचिदवेदिषम् ।
इति द्वे तु सुखाज्ञाने परामृशति चोत्थितः ॥ ५९ ॥
परामर्शोऽनुभूतेऽस्तीत्यासीदनुभवस्तदा ।
चिदात्मत्वत्स्वतो भाति सुखमज्ञानधीस्ततः ॥ ६० ॥
अथवा ज्याप्रमाणें सार्वभौम राजा आपणास सर्व विषयभोगाची प्राप्ति झाल्यामुळें तृप्त होऊन मानुषानंदाच्या शिखरी जाऊन मूर्तिमान आनंदच होऊन राहतो. ॥ ५१ ॥
किंवा ज्याप्रमाणें महाविप्र ब्रह्मवेत्ता विद्यानंदाची परम सीमा पावून कृतकृत्य होऊन स्वस्थ राहतो, त्याप्रमाणें सुषुप्तीचे ठायी जीवआनंदरूप होऊन राहतो. ॥ ५२ ॥
सुषुप्तीच्या आनंदाविषयीं अति बालादिक तिन्हींचा मात्र येथें इष्टांत देण्याचे कारण हेंच कीं, अज्ञान्यांमध्ये तान्हे मूल, प्रौढामध्यें सार्वभौम राजा, आणि विद्वानांमध्यें ब्रह्मवेत्ता इतके सुखी आहेत. बाकीच्या लोकांस सुख नाही. ॥ ५३ ॥
वरील दृष्टांतांत कुमारादिक जसे मूर्तिमान आनंदच आहेत त्याप्रमाणे हा जीवही ब्रह्मानंदैकतत्पर होऊन स्त्रीस आलिंगन दिलेल्या कामी पुरुषाप्रमाणे आत बाहेर कांहींच जाणत नाहीं. ॥ ५४ ॥
येथे बाहेर आंत जें म्हटलें, तें पुढील दृष्टांतावरून चांगले समजेल. ज्याप्रमाणें घराबाहेर रस्त्यावर होणारा लोकांचा गलबला व गाड्यांचा घडघडाट यास बाहेरचा वृत्तांत म्हणतात, आणि आतील गृहकृत्यांस आंतला म्हणतात. त्याप्रमाणें एथेंही जागृत अवस्था बाहेरील आणि नाडीमध्ये होणारी अवस्था आंतील ॥ ५५ ॥
सुषुप्तीत बापाचा बापपणा व लेकाचा लेकपणा राहत नाहीं अशा अर्थाची जी श्रुति आहे, तिजवरून त्यावेळी जीवत्वाचे निवारण होतें व तेव्हां संसारीपणाही नजरेस येत नाहीं. म्हणून निद्रेमध्यें जीव हा ब्रह्मरूपच असतो असें म्हणण्यास कोणची हरकत आहे ? ॥ ५६ ॥
कारण मी पिता मी पुत्र असा जो अभिमान तोच सर्व सुखदुःखाची खाण आहे. त्यांतच सर्व प्रपंच आहे. म्हणून तो नाहीसा झाला असतां हा जीव सर्व शोकापासून मुक्त होतो. ॥ ५७ ॥
सषुप्तिकाली सुख असतें याविषयी अथर्वश्रुतीचे प्रमाण आहे. सुषुप्तीच्या वेळीं सर्व जागृदादि प्रपंचाचा तमःप्रधान प्रकृतीत लय झाला असतां त्या तमाने आच्छादित जीव सुखरूप ब्रह्मच होऊन राहतो. ॥ ५८ ॥
आमचा नेहमीचा अनुभवही तसाच आहे. निद्रेतून जागा झाल्यावर मी इतक्या वेळ सुखाने निजलो होतों, व इतका वेळ मला कांहींच समजलें नाही असें निद्रेतील सुखाचे व अज्ञानाचे स्मरण आम्हांस होते. ॥ ५९ ॥
अनुभवावाचून स्मरण कधीच होत नाहीं. ज्याअर्थी जागे झाल्यावर सुखाचे व अज्ञानाचे स्मरण होते त्या अर्थी निद्राकालीं अनुभव आलाच पाहिजे. आतां अनुभवास इंद्रियादिक साधने पाहिजेत आणि तीं तर सुषुप्तीमध्ये नाहींत, मग अनुभव कसा आला ? अशी एक येथे शंका येण्याजोगी आहे. तर त्याचे समाधान इतकेंच कीं, सुख हें स्वप्रकाश चिद्रूप असल्यामुळें तें भासण्यास साधनाची जरूर नाहीं. आणि त्याचे जोरानेच अज्ञानही समजते. ॥ ६० ॥
ब्रह्मविज्ञानमानन्दमिति वाजसनेयिनः ।
पठन्त्यतः स्वप्रकाशं सुखं ब्रह्मैव नेतरत् ॥ ६१ ॥
यदज्ञानं तत्र लीनौ तौ विज्ञानमनोमयौ ।
तयोर्हि विलयावस्था निद्राज्ञानं च सैव हि ॥ ६२ ॥
विलीनघृतवत्पश्चात्स्याद्विज्ञानमयो घनः ।
विलीनावस्थ आनन्दमयशब्देन कथ्यते ॥ ६३ ॥
सुप्तिपूर्वक्षणे बुद्धिवृत्तिर्या सुखबिम्बिता ।
सैव तद्बिम्बसहिता लीनानन्दमयस्ततः ॥ ६४ ॥
अन्तर्मुखो य आनन्दमयो ब्रह्मसुखं तदा ।
भुङ्क्ते चिद्बिम्बयुक्ताभिरज्ञानोत्पन्नवृत्तिभिः ॥ ६५ ॥
अज्ञानवृत्तयः सूक्ष्मा विस्पष्टा बुद्धिवृत्तयः ।
इति वेदान्तसिद्धान्तपारगाः प्रवदन्ति हि ॥ ६६ ॥
माण्डुक्यतापनीयादिश्रुतिष्वेतदतिस्फुटम् ।
आनन्दमयभोक्तृत्वं ब्रह्मानन्दे च भोग्यता ॥ ६७ ॥
एकीभूतः सुषुप्तस्थः प्रज्ञानघनतां गतः ।
आनन्दमय आनन्दभुक् चेतोमयवृत्तिभिः ॥ ६८ ॥
विज्ञानमयमुख्यैर्यो रूपैर्युक्तः पुराऽधुना ।
स लयेनैकतां प्राप्तो बहुतण्डुलपिष्टवत् ॥ ६९ ॥
प्रज्ञानानि पुरा बुद्धिवृत्तयोऽथ घनोऽभवत् ।
घनत्वं हिमबिन्दूनामुदग्देशे यथा तथा ॥ ७० ॥
हे स्वप्रकाश सुखच ब्रह्म आहे अशाविषयीं “ब्रह्म विज्ञानमानंदम् ” म्हणजे ज्ञानरूप आनंदच ब्रह्म आहे असें वाजसनीय शाखेत म्हटलें आहे. ॥ ६१ ॥
हा जो सुखज्ञानाचा अनुभव आम्ही सांगितला तो विज्ञानमय शब्दवाच्य जीवाला आहे अशी कोणी शंका घेऊं नये. कारण त्या अज्ञानांतच विज्ञानमय आणि मनोमय, हे दोघेही लीन होतात. त्यांची जी विलयावस्था तीच निद्रा आणि तेंच अज्ञान. ॥ ६२ ॥
ज्याप्रमाणें उष्णतेच्या संयोगाने पातळ झालेलें तूप पुनः घट्ट होते त्याप्रमाणें जागृत्स्वप्नावस्थेतील भोगप्रद कर्माचा क्षय झाला असतां लीन झालेलें अंतःकरण पुनः कर्मवशात् जागृत होऊन विज्ञानमय होतें. या विलीनावस्थेलाच आनंदमय असें नांव दिलें आहे. ॥ ६३ ॥
म्हणजे निद्रेच्या पर्वूक्षणी जी वृत्ति बाहेरचे जग. सोडून स्वरूपाकडे वळण्यानें स्वरूपसुखांत निमग्न होऊन लीन होते. या अवस्थेला आनंदमय कोश म्हणतात. ॥ ६४ ॥
असा हा अंतर्मुखवृत्तीचा परिणामरूप आनंदमय कोश त्यावेळीं ब्रह्मसुखाचा उपभोग घेतो. त्या काळी त्या सुखानें बिंबित अशा अज्ञानवृत्ति असतात, त्यामुळें भोग घडतो. ॥ ६५ ॥
त्या अज्ञानवृत्ति सूक्ष्म म्हणजे अस्पष्ट आहेत आणि बुद्धिवृत्ति त्यांपेक्षा स्पष्ट आहेत असें वेदातसिद्धातपारग पुरुष म्हणतात. ॥ ६६ ॥
ही गोष्ट मांडूक्य तापनीयादि श्रुतीमध्ये स्पष्ट करून सांगितली आहे. तेथे असें झटले आहे कीं, आनंदमय हा भोक्ता आहे. आणि ब्रह्मानंद हे त्याचें भोग्य आहे. ॥ ६७ ॥
मांडुक्य श्रुतीतील ” प्रज्ञानघनैव आनंदमयः ” इत्यादि वाक्यांचा अर्थ असा कीं, विज्ञानमय वाच्य जीव सुषुप्तीमध्ये स्वरूपाशी ऐक्य पावून आनंदमय होऊन चैतन्य प्रतिबिंबित वृत्तीच्या योगाने तेथील ब्रह्मानंदाचा भोग घेतो. ॥ ६८ ॥
ऐक्य पावतो म्हणून जें वर म्हटलें त्याचा अर्थ असा की, पूर्वी जो विज्ञानमय आदिकरून रूपांनी युक्त होतो; तोच आतां पुष्कळ तांदुळांच्या पिठाप्रमाणें त्या सर्व रूपाच्या लयाशीं ऐक्य पावतो. ॥ ६९ ॥
ज्याप्रमाणें थंड देशांत पाणी घट्ट होतें तसें घटादिक ज्या बुद्धिवृत्ति ज्यास प्रज्ञान असें म्हणतात त्या सुषुप्तींत घट्ट होतात. तेव्हां तो चिद्रूपाशी ऐक्य पावतो. ॥ ७० ॥
तद्घनत्वं साक्षिभावं दुःखाभावं प्रचक्षते ।
लौकिकास्तार्किका यावद्दुःखवृत्तिविलोपनात् ॥ ७१ ॥
अज्ञानबिम्बिता चित्स्यान् मुखमानन्दभोजने ।
भुक्तं ब्रह्मसुखं त्यक्त्वा बहिर्यात्यथ कर्मणा ॥ ७२ ॥
कर्म जन्मान्तरेऽभूद्यत्तद्योगाद्बुद्ध्यते पुनः ।
इति कैवल्यशाखायां कर्मजो बोध ईरितः ॥ ७३ ॥
कंचित्कालं प्रबुद्धस्य ब्रह्मानन्दस्य वासना ।
अनुगच्छेद्यतस्तूष्णीमास्ते निर्विषयः सुखी ॥ ७४ ॥
कर्मभिः प्रेरितः पश्चान्नाना दुःखानि भावयन् ।
शनैर्विस्मरति ब्रह्मानन्दमेषोऽखिलो जनः ॥ ७५ ॥
प्रागूर्ध्वमपि निद्रायाः पक्षपातो दिने दिने ।
ब्रह्मानन्दे नृणां तेन प्राज्ञोऽस्मिन्विवदेत कः ॥ ७६ ॥
ननु तूष्णीं स्थितौ ब्रह्मानन्दश्चेद्भाति लौकिकाः ।
अलसाश्चरितार्थाः स्युः शास्त्रेण गुरुणात्र किम् ॥ ७७ ॥
बाढं ब्रह्मेति विद्युच्चेत्कृतार्थास्तावतैव ते ।
गुरुशास्त्रे विनाऽत्यन्तं गम्भीरं ब्रह्म वेत्ति कः ॥ ७८ ॥
जानाम्यहं त्वदुक्त्याद्य कुतो मे न कृतार्थता ।
शृण्वत्र त्वादृशं वृत्तं प्राज्ञं मन्यस्य कस्यचित् ॥ ७९ ॥
चतुर्वेदविदे देयमिति शृण्वन्नवोचत ।
वेदाश्चत्वार इत्येवं वेद्मि मे दीयतां धनम् ॥ ८० ॥
ज्याला वेदांतशास्त्रांत प्रज्ञानघन साक्षी असें म्हटलें त्यालाच बाकीचे साधारण लोक व तार्किकादिक पंडित दुःखाभाव असें म्हणतात. कारण निद्रेत सर्व दुःखवृत्तीचा लोप होतो. ॥ ७१ ॥
या आनंदभोगांना अज्ञानप्रतिबिंबित चैतन्य साधन आहे, अशी एकदा ज्याची रुचि घेतली आहें असें जें ब्रह्मसुख तें सोडून देऊन जीव बाहेर येतो त्याला कारण त्याचें कर्मच. ॥ ७२ ॥
पूर्व जन्मी केलेल्या कर्मामुळेच पुनः जागा होतो, असें जागृतीस कर्मच कारण आहे; असें कैवल्यशाखेंत म्हटलें आहे. ॥ ७३ ॥
मनुष्य जागा झाल्यानंतर कांहीं वेळपर्यंत निद्रेत भोगलेल्या- ब्रह्मानंदाचा ठसा असतो. ही एक आनंद भोगल्याची खुणाच आहे. कारण; त्यावेळी अंथरुणावर पडलेला असतां मनामध्ये कोणचाही विषय नसता सुखी असतो. ॥ ७४ ॥
तो तसाच सुखानें स्वस्थ पडून राहता. परंतु कर्माहींकरून प्रेरित होत्साता नानाप्रकारचीं दुःखे मनांत येऊन हळूहळू त्यास ब्रह्मानंदाची विस्मृति पडते. ॥ ७५ ॥
निद्रेच्या पूर्वी व तिच्या अंती काहीवेळ ब्रह्मानंदाविषयींची प्रीति असलेली मनुष्यास दृष्टीस पडते. कारण पूर्वी तो आनंद भोगण्याकरितां मृदु शय्यादि साधनांचा प्रयत्न, वअंती हांतरूण सोडून उठण्याचा कंटाळा, ह्या दोन गोष्टींवरून हें सिद्ध होतें. तेव्हां या निद्रेत ब्रह्मानंद आहे याविषयी सुज्ञांस संशय कधी येईल काय ? ॥ ७६ ॥
आजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, सुषुप्तीच्या आदि अंतीच्या तुष्णी स्थितींत ब्रह्मानंद भासतो. असे जर मानले तर काही खटपट न करिता मनुष्यास मोक्षप्राप्ति होईल; मग गुरु आणि शास्त्र यांची गरज काय ? ॥ ७७ ॥
खरें आहे. परंतु ब्रह्माचें ज्ञान जर होईल तर तेवढ्यानेंच ते कृतार्थ होतील. पण गुरुशास्त्रांचे साहाय्यावाचून तें ज्ञानच होत नाहीं ॥ ७८ ॥
तुमच्या सांगण्यावरूनच तेच, ब्रह्म असे आम्हांस समजले असून आम्हांस कृतार्थता कां वाटत नाही ? असा प्रश्न आमच्या वरील उत्तरावर कोणी करीत असल तर त्या प्रश्न करणाऱ्या मनुष्यासारख्या कोणी एका तत्त्वज्ञ म्हणून घेणाराची एक गोष्ट आम्ही सांगतो ॥ ७९ ॥
कोणी एका राजानें वर्तमानपत्रांत अशी जाहिरात दिली की, जो कोणी चार वेद जाणता असेल त्यास हजार रुपयांचे बक्षीस दिलें जाईल. ही जाहिरात वाचून कोणी एक भट्ट ब्राम्हण राजाकडे येऊन म्हणाला. वेद चार आहेत हेमी पक्के जाणतो. तर जाहीर केलेलें बक्षीस मला देण्याची आज्ञा व्हावी. ॥ ८० ॥
साङ्ख्यमेवैष जानाति न तु वेदानशेषतः ।
यदि तर्हि त्वमप्येवं नाशेषं ब्रह्म वेत्सि हि ॥ ८१ ॥
अखण्डैकरसानन्दे मायातत्कार्यवर्जिते ।
अशेषत्वसशेषत्ववार्तावसर एव कः ॥ ८२ ॥
शब्दानेव पठस्याहो तेषामर्थं च पश्यसि ।
शब्दपाठेऽर्थबोधस्ते सम्पाद्यत्वेन शिष्यते ॥ ८३ ॥
अर्थे व्याकरणाद्बुद्धे साक्षात्कारोऽवशिष्यते ।
स्यात्कृतार्थत्वधीर्यावत्तावद्गुरुमुपास्व भोः ॥ ८४ ॥
आस्तामेतद्यत्र यत्र सुखं स्याद्विषयैर्विना ।
तत्र सर्वत्र विद्ध्येतां ब्रह्मानन्दस्य वासनाम् ॥ ८५ ॥
विषयेष्वपि लब्धेषु तदिच्छोपरमे सति ।
अन्तर्मुखमनोवृत्तावानन्दः प्रतिबिम्बति ॥ ८६ ॥
ब्रह्मानन्दो वासना च प्रतिबिम्ब इति त्रयम् ।
अन्तरेण जगत्यस्मिन्नानन्दो नास्ति कश्चन ॥ ८७ ॥
तथा च विषयानन्दो वासनानन्द इत्यमू ।
आनन्दौ जनयन्नास्ते ब्रह्मानन्दः स्वयंप्रभः ॥ ८८ ॥
श्रुतियुक्त्यनुभूतिभ्यः स्वप्रकाशचिदात्मके ।
ब्रह्मानन्दे सुप्तिकाले सिद्धे सत्यन्यदा शृणु ॥ ८९ ॥
य आनन्दमयः सुप्तौ स विज्ञानमयात्मताम् ।
गत्वा स्वप्नं प्रबोधं वा प्राप्नोति स्थानभेदतः ॥ ९० ॥
तें ऐकून राजास हंसू आहें आणि म्हणाला, काय वेडा ब्राम्हण आहे हा ! अरे केवळ संख्येच्या ज्ञानानें हजार रुपयाचें बक्षीस पटकावून घ्यावे म्हणतोस काय ? असो. ज्याप्रमाणें त्या ब्राह्मणाला अशेष वेदांचा तत्त्वार्थ न समजतां केवळ संख्या मात्र समजली, तसेंच आमच्या शंकाकारासही ब्रह्माचे अशेष स्वरूपज्ञान न होतां केवळ ब्रह्म हा शब्द मात्र समजला. तेव्हां तेवढ्याने कृतार्थता कशी होईल ? ॥ ८१ ॥
यावरही एक अशी शंका आहे कीं, ब्रह्म अखंडैकरस आनंदरूप आहे. येथें माया व तिचे कार्य याचा संपर्कच नाहीं. असें असून अशेष सशेष असें म्हणण्याला तेथें जागाच नाहीं. ॥ ८२ ॥
तर या पूर्व-पक्षकारास आम्ही असें विचारतो कीं, ब्रह्म सच्चिदानंदरूप आहे इतके शब्द तोंडपाठ झाल्यानेंच पुरे आहे, कीं त्यांचा अर्थ समजला पाहिजे ? नुसते शब्द पाठ करून कांहीं उपयोग नाहीं. तेव्हां त्यांचा अर्थ चांगला समजला पाहिजे ॥ ८३ ॥
बरें व्याकरणादिकांचे साहाय्याने अर्थही समजला तरी तेवढ्याने कुठे भागते. त्याचा साक्षात्कार म्हणून जो आहे तो राहिलाच. तो झाल्यावांचून ज्ञान संपूर्ण होत नाही. तसे संपूर्ण ज्ञान होऊन कृतार्थता होईपर्यंत सद्गुरूची सेवा केली पाहिजे. म्हणूनच आधीं अशेष हा शब्द घातला. ॥ ८४ ॥
असो. आतां आपल्या विषयाकडे वळू. वासनानंदाची खूण हीच कीं, नेहमीच्या व्यवहारामध्ये जेव्हां जेव्हां विषयांवांचून मनुष्यास सुख वाटतें, तेव्हां तेव्हां तो ब्रह्मानंदाचा संस्काररूप वासनानंदच समजावा. ॥ ८५ ॥
विषयानंदांतही असाच कांहीं प्रकार घडतो. कारण जेव्हां जेव्हां आम्हास विषयांपासून आनंद होतो तेव्हां तेव्हां विषय मिळून त्याची इच्छा शांत झाल्यावर मनोवृत्ति अंतर्मुख होऊन त्यांत ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब पडते. ॥ ८६ ॥
येणेप्रमाणें ब्रह्मानंद, वासनानंद, आणि विषयानंद असे तीनच आनंद या जगांत आहेत. बाकी जे आनंद शास्त्रांत किंवा लौकिकांत आहेत त्या सर्वांचा समावेश या तिहींत होतो. ॥ ८७ ॥
या तिहींपैकी वासनानंद आणि विषयानंद या दोहोंची उत्पत्ति ब्रह्मानंदापासूनच आहे. आणि तो ब्रह्मानंद मात्र केवळ स्वयंप्रकाश आहे. ॥ ८८ ॥
येथपर्यंत श्रुति, युक्ति आणि अनुभव या तिहींच्या योगेंकरून सुषुप्तिकाळी ब्रह्मानंद स्वप्रकाश आहे असें सिद्ध केलें. आतां दुसऱ्या वेळी म्हणजे जागृतीमध्येही त्याची सिद्धता करूं. ॥ ८९ ॥
सुषुप्तीत जो आनंदमय असतो तोच विज्ञानमय होऊन त्या त्या स्थानभेदाप्रमाणें स्वप्न व जागृति या दोन अवस्थांप्रत पावतो. ॥ ९० ॥
नेत्रे जागरणं कण्ठे स्वप्नः सुप्तिर्हृदम्बुजे ।
आपादमस्तकं देहं व्याप्य जागर्ति चेतनः ॥ ९१ ॥
देहतादात्म्यमापन्नस्तप्तायः पिण्डवत्ततः ।
अहं मनुष्य इत्येवं निश्चित्यैवावतिष्ठते ॥ ९२ ॥
उदासीनः सुखी दुःखीत्यवस्थात्रयमेत्यसौ ।
सुखदुःखे कर्मकार्ये त्वौदासीन्यं स्वभावतः ॥ ९३ ॥
बाह्यभोगान्मनोराज्यात्सुखदुःखे द्विधा मते ।
सुखदुःखान्तरालेषु भवेत्तूष्णीमवस्थितिः ॥ ९४ ॥
न कापि चिन्ता मेऽस्त्यद्य सुखमास इति ब्रुवन् ।
औदासीन्ये निजानन्दभानं वक्त्यखिलः जनः ॥ ९५ ॥
अहमस्मीत्यहङ्कारसामान्याच्छादितत्वतः ।
निजानन्दो न मुख्योऽयं किन्त्वसौ तस्य वासना ॥ ९६ ॥
नीरपूरितभाण्डस्य बाह्ये शैत्यं न तज्जलम् ।
किन्तु नीरगुणस्तेन नीरसत्तानुमीयते ॥ ९७ ॥
यावद्यावदहङ्कारो विस्मृतोऽभ्यासयोगतः ।
तावत्तावत्सूक्ष्मदृष्टेर्निजानन्दोऽनुमीयते ॥ ९८ ॥
सर्वात्मना विस्मृतः सन्सूक्ष्मतां परमां व्रजेत् ।
अलीनत्वान्न निद्रैषा ततो देहोऽपि नो पतेत् ॥ ९९ ॥
न द्वैतं भासते नापि निद्रा तत्रास्ति यत्सुखम् ।
स ब्रह्मानन्द इत्याह भगवानर्जुनं प्रति ॥ १०० ॥
तीं स्थानें अशी; जागृतीचे स्थान नेत्र, स्वप्नाचें स्थान कंठ, आणि सुषुप्तीचे स्थान हदयकमळ. येथें जागृतीचे स्थान नत्र असें जें म्हटलें तें केवळ सर्व देहाचे उपलक्षण समजावे वास्तविक पाहता चिदाभास हा आपाद- मस्तक देहाला व्यापून राहतो. ॥९१ ॥
ज्याप्रमाणें तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांत अग्नि व्यापून राहतो तसा हा जीवही देहतादात्म्य पावून मी मनुष्य असा निश्चय करून जागृतीत असतो. ॥ ९२ ॥
ह्या देहाच्या अभिमानास कारणीभूत अशा जीवाच्या तीन अवस्था आहेत. सुखी, दुःखी आणि उदासीन. आम्ही जे कर्म करतो त्याची फले दोन प्रकारची; एक सुख वाटणे, दुसरे दुःख वाटणे. आणि स्वाभाविक जी जीवाची स्थिति ते औदासीन्य. ॥ ९३ ॥
या सुखदुःखाचे दोन प्रकार आहेत. बाह्य विषयभोगापासून होणारी सुखदुःखें, मनोराज्यापासून होणारी सुखदुःखें आणि सुखही नाहीं आणि दुःखही नाहीं म्हणजे दोहोंमधील जी फट त्या फटीस तूष्णीं स्थिति असें म्हणतात. ॥ ९४ ॥
आज मला कशाची काळजी नाहीं, मी सुखी आहे, असे म्हणून प्रत्येक मनुष्य निजानंदाचे भान उदासीन स्थितीमध्ये प्रकट करतो. ॥ ९५ ॥
परंतु हा निजानंद मुख्य म्हणतां येत नाहीं, हा केवळ त्याची वासना म्हणजे संस्कार आहे. कारण तेथें मी अशा सामान्य अहंकाराचे आच्छादन आहे. ॥ ९६ ॥
ज्याप्रमाणें गार पाण्यानें भरलेल्या भांड्यात बाहेरील भाग थंड लागतो, पण ते कांहीं प्रत्यक्ष पाणी नसते, तर केवळ तो पाण्याचा एक गुण आहे. आणि त्या गुणावरून पाण्याच्या अस्तित्त्वाचे अनुमान करतां येतें.॥९७॥
त्याप्रमाणे शास्त्रांत सांगितलेल्या योगाभ्यासानें अहंकाराचें जसजसे विस्मरण होत जाईल तसतसे सूक्ष्म दृष्टीस निजानंदाचें अनुमान करितां येईल. ॥ ९८ ॥
असें विस्मरण होतां होतां अहंकार अगदींच सूक्ष्म होतो तेव्हां साक्षात् बह्मानंदाचाच अनुभव होतो. ही स्थिति निद्रा आहे अशी कोणी शंका घेऊं नये. कारण निद्रेत अहंकार अगदीं लीन म्हणजे नाहीसाच होतो. तसा येथे होत नाहीं. कारण तसें होईल तर निद्रेप्रमाणें देह, लागलाच पडेल. ॥ ९९ ॥
जेव्हां द्वैतही भासत नाहीं आणि निद्राही नाहीं अशा वेळीं जें मुख भासते तोच ब्रह्मानंद असें भगवंतानी गीतेत सांगितलें आहे. ॥ १०० ॥
शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥ १०१ ॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ १०२ ॥
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ १०३ ॥
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ १०४ ॥
सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ १०५ ॥
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ १०६ ॥
तं विद्याद्दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ १०७ ॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगि विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ १०८ ॥
उत्सेक उदधेर्यद्वत्कुशाग्रेणैकबिन्दुना ।
मनसो निग्रहस्तद्वद्भवेदपरिखेदतः ॥ १०९ ॥
बृहद्रथस्य राजर्षेः शाकायन्यो मुनिः सुखम् ।
प्राह मैत्राख्यशाखायां समाध्युक्तिपुरःसरम् ॥ ११० ॥
तें असे कीं, हे अर्जुना, हळू हळू धैर्ययुक्त बुद्धीने मनाचा उपरम करून आत्म्यावर त्याची स्थापना करावी. आणि मग कांहीं एक चिंतन न करतां स्वस्थ बसावे हाच योगाचा परमावधि. ॥ १०१ ॥
त्याचा क्रम असा कीं, ज्या ज्या विषयापासून मन उठून दुसऱ्या विषयाकडे धावते, तोच त्याला तेथून ओढून आणून बसवावे. कारण ते फार चंचळ आणि अस्थिर आहे. ॥ १०२ ॥
याप्रमाणे मन शांत झालें असतां मनामधील रजतमादि कल्मष नाहीसें होऊन हें सर्व ब्रह्मच आहे असें त्या योग्यास ज्ञान होऊन उत्तम सुखाची प्राप्ति होते. ॥ १०३ ॥
त्या वेळेस योगाभ्यासानें चित्ताचा निरोध झाल्याने त्याचा उपरम होऊन आत्म्याकडे त्याची दृष्टि परतते. आणि आपल्यामध्येच आपण तो सुख पावतो. ॥ १०४ ॥
तें सुख अतीद्रिंय असून केवळ बुद्धीस मात्र ग्राह्य असतें. याप्रमाणे एकदा आत्म्यावर योग्याचे मनाची स्थापना झाली असतां तो स्वरूपापासून ढळत नाहीं. ॥ १०५ ॥
अशी आत्मप्राप्ति झाल्यावर त्यापेक्षा त्याला दुसरा कोणचाही लाभ अधिक वाटत नाहीं. आणि एकदा त्याची आत्मस्वरूपाशी चिकाटी बसली ज्याने शस्त्रघातासारख्या भयंकर दुःखाच्यानेही त्याला तेधून हालविता येत नाही. ॥ १०६
या योगांत दुःखाचा संयोग मुळींच नाही. वैराग्ययुक्त चित्ताने मुमुक्षूने याचे अनुष्ठान करावे. ॥ १०७ ॥
याप्रमाणे सदा सर्वदा आत्म्याचें अनुसंधान करणारा पापरहित योगी आत्यंतिक जें ब्रह्मसुख तें अनायासानें पावतो. ॥ १०८ ॥
मनोनिग्रह कठिण आहे म्हणून बसून उपयोग नाहीं. टिट्टिभपक्ष्यानें समुद्राने नेलेली अंडी परत मिळावी म्हणून आपणामध्ये आणि समुद्रामध्ये अंतर मुळींच न पाहता कुशाग्रेकरून त्याचा एकेक बिंदू उपसण्याचा प्रयत्न धैर्य न सोडता चालविला असतां तो जसा शेवटीं सिद्धीस गेला, त्याप्रमाणें मनाचा निग्रहही खचित सिद्धीस जाईलच जाईल. ॥ १०९ ॥
मैत्रायणी नामक यजुःशाखेमध्ये शाकायन्य नामक मुनीने आपला शिष्य जो बृहद्रथ राजा यास समाधीने सुख प्राप्ति होते अशाविषयीं पुष्कळ उपदेश केला आहे. ॥ ११० ॥
यथा निरिन्धनो वह्निः स्वयोनावुपशाम्यति ।
यथा वृत्तिक्षयाच्चित्तं स्वयोनावुपशाम्यति ॥ १११ ॥
स्वयोनावुपशान्तस्य मनसः सत्यकामिनः ।
इन्द्रियार्थविमूढस्यानृताः कर्मवशानुगाः ॥ ११२ ॥
चित्तमेव हि संसारस्तत्प्रयत्नेन शोधयेत् ।
यच्चित्तस्तन्मयो मर्त्यो गुह्यमेतत्सनातनम् ॥ ११३ ॥
चित्तस्य हि प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम् ।
प्रसन्नात्मात्मनि स्थित्वा सुखमक्षयमश्नुते ॥ ११४ ॥
समासक्तं यथा चित्तं जन्तोर्विषयगोचरे ।
यद्येवं ब्रह्मणि स्यात्तत्को न मुच्येत बन्धनात् ॥ ११५ ॥
मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धं चाशुद्धमेव च ।
अशुद्धं कामसम्पर्काच्छुद्धं कामविवर्जितम् ॥ ११६ ॥
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥ ११७ ॥
समाधिनिर्धूतमलस्य चेतसो
निवेशितस्यात्मनि यत्सुखं भवेत् ।
न शक्यते वर्णयितुं गिरा तदा
स्वयं तदन्तःकरणेन गृह्यते ॥ ११८ ॥
यद्यप्यसौ चिरं कालं समाधिर्दुर्लभो नृणाम् ।
तथापि क्षणिको ब्रह्मानन्दं निश्चाययत्यसौ ॥ ११९ ॥
श्रद्धालुर्व्यसनी योऽत्र निश्चिनोत्येव सर्वथा ।
निश्चिते तु सकृत्तस्मिन् विश्वसित्यन्यदाप्ययम् ॥ १२० ॥
तेथें त्यांनीं असें सांगितलें आहे कीं, सर्व काष्ठादिक इंधन जळून गेल्यावर ज्वाला शांत होऊन अग्नि जसा नुसता तेजमात्र राहतो, त्याप्रमाणें घटपटाटिक वृत्तींचा क्षय झाला असतां चित्ताचे रजतमत्व जाऊन तें केवळ सात्विक होऊन राहते. यालाच मनोनाश म्हणतात. ॥ १११ ॥
याप्रमाणें आपल्या कारणाच्याठायीं मनाची शान्ति होऊन केवळ आत्म्याकडेच त्याचा ध्यास लागून विषयापासून तें परतले असतां अर्थातच कर्मापासून होणारी सर्व दुःखे मिथ्या ठरतात. ॥ ११२ ॥
कारण आमचा सर्व प्रपंच मनाचाच केलेला आहे. म्हणून त्या मनाचे शोधन प्रयत्नानें केलें पाहिजे. ज्या विषयाकडे मनुष्याचे मन लागलें तो तन्मय होतो. हें गूढ कांहीं आजकालचें नव्हे. तर अनादिकालापासून चालत आलें आहे. ॥ ११३ ॥
चित्ताची शद्धि होऊन ब्रह्मानुसंधान त्यास लागलें म्हणजे सर्व शुभाशुभ कर्मांचा नाश होऊन मनुष्याचें चित्त प्रसन्न होऊन आत्मस्वरूपीं त्याला अक्षय सुख मिळतें. ॥ ११४ ॥
प्राण्यांचे चित्त जसे विषयांवर लागलेले आहे, तसें ब्रह्मावर लागेल तर कोण बरें मुक्त होणार नाही ? ॥ ११५ ॥
मनाचे प्रकार दोन. एक शुद्ध आणि अशुद्ध. जेव्हां ते कामक्रोधांनी भरलेलें असतें तेव्हां तें अशुद्ध आणि त्याही करून रहित असते तेव्हां तें शुद्ध समजावे. ॥ ११६ ॥
मनुष्याच्या बंधमाक्षांस कारण मनच आहे. तें विषयासक्त झाल्याने मनुष्य बंधात पडतो. आणि तें निर्विषय झाल्याने मुक्त होतो. ॥ ११७ ॥
समाधीच्या अभ्यासानें ज्याचा मल धुवून टाकलेला आहे व ज्याचा प्रवेश आत्मस्वरूपीं झाला आहे, त्या चित्तास जें सुख होतें त्याचें वर्णन वाणीने करणें अशक्य आहे. तें स्वतः अन्तकरणानेंच ग्रहण करावयाचें. ॥ ११८ ॥
हा समाधि चिरकाल राहणे जरी कठिण आहे, तथापि तो क्षणभर मिळू शकतो, तेवढा ब्रह्मानंदाचा निश्चय करण्यास बस आहे. ॥ ११९ ॥
या आनंदाचा निश्चय होण्यास श्रद्धा आणि व्यसन ही दोन साधने अवश्य आहेत. व्यसन म्हणजे एका कामाच्या पाठीस लागलें असतां तें होई-पर्यंत चैन नसणे. तो एक केवळ निश्चय झाला असतां तो तसाच सर्वदा आहे, अशी खात्री होते. ॥ १२० ॥
तादृक् पुमानुदासीनकालेऽप्यानन्दवासनाम् ।
उपेक्ष्य मुख्यमानन्दं भावयत्येव तत्परः ॥ १२१ ॥
परव्यसनिनी नारी व्यग्रापि गृहकर्मणि ।
तदेवास्वादयत्यन्तः परसङ्गरसायनम् ॥ १२२ ॥
एवं तत्त्वे परे शुद्धे धीरो विश्रान्तिमागतः ।
तदेवास्वादयत्यन्तर्बहिर्व्यवहारन्नपि ॥ १२३ ॥
धीरत्वमक्षप्राबल्येऽप्यानन्दास्वादवाञ्छया ।
तिरस्कृत्याखिलाक्षाणि तच्चिन्तायां प्रवर्तनम् ॥ १२४ ॥
भारवाही शिरोभारं मुक्त्वास्ते विश्रमं गतः ।
संसारव्यापृतित्यागे तादृग्बुद्धिस्तु विश्रमः ॥ १२५ ॥
विश्रान्तिम्ं परमां प्राप्तस्त्वौदासीन्ये यथा तथा ।
सुखदुःखदशायां च तदानन्दैकतत्परः ॥ १२६ ॥
अग्निप्रवेशहेतौ धीः शृङ्गारे यादृशी तथा ।
धीरस्योदेति विषयेऽनुसन्धानविरोधिनी ॥ १२७ ॥
अविरोधिसुखे बुद्धिः स्वानन्दे च गमागमौ ।
कुर्वन्त्यास्ते क्रमादेषा काकाक्षिवदितस्ततः ॥ १२८ ॥
एकैव दृष्टिः काकस्य वामदक्षिणनेत्रयोः ।
यात्यायात्येवमानन्दद्वये तत्त्वविदो मतिः ॥ १२९ ॥
भुञ्जानो विषयानन्दं ब्रह्मानन्दं च तत्त्ववित् ।
द्विभाषाभिज्ञवद्विद्यादुभौ लौकिकवैदिकौ ॥ १३० ॥
दुःखप्राप्तौ न चोद्वेगो यथा पूर्वं यतो द्विदृक् ।
गङ्गामग्नार्धकायस्य पुंसः शीतोष्णधीर्यथा ॥ १३१ ॥
इत्थं जागरणे तत्त्वविदो ब्रह्मसुखं सदा ।
भाति तद्वासनाजन्ये स्वप्ने तद्भासते तथा ॥ १३२ ॥
अविद्यावासनाप्यस्तीत्यतस्तद्वासनोत्थिते ।
स्वप्ने मूर्खवदेवैष सुखं दुःखं च वीक्षते ॥ १३३ ॥
ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे ब्रह्मानन्दप्रकाशकम् ।
योगिप्रत्यक्षमध्याये प्रथमेऽस्मिन्नुदीरितम् ॥ १३४ ॥
इति ब्रह्मानन्दे योगानन्दः समाप्तः ॥ ११ ॥
एकदा निश्चय झालेल्या पुरुषास उदासीन दशेमध्ये देखील भासणारा जो वासनानंद त्याचीही उपेक्षा करून मुख्य जो ब्रह्मानंद तिकडेच त्याचें लक्ष असतें. ॥ १२१ ॥
ज्याप्रमाणें जिचे सर्व चित्त परपुरुषाकडे लागले आहे अशी व्यभिचारिणी स्त्री गृहकृत्यात निमग्न असतांहि आतून त्या परसंगरसायनाचा आस्वाद घेत असते. ॥ १२२ ॥
त्याप्रमाणें ज्या धीर पुरुषास एकदा परब्रह्माचा निश्चय होऊन विश्रांति मिळाली तो व्यवहार करीत असतांही आंतून नित्य त्याचा स्वाद घेत असतो. ॥ १२३ ॥
एथें धीर म्हणून जो शब्द आहे त्याचाअर्थ असा कीं, इंद्रिये मनास विषयांकडे ओढीत असूनही ब्रह्मानंद चाखण्याच्या इच्छेने सर्व ईद्रियांचा तिरस्कार करून जो पुरुष त्या तत्त्वाचेच चिंतन करतो तो धीर समजावा. ॥ १२४ ॥
आणि विश्रांति शब्दाचा अर्थ असा कीं, जसा एखादा ओझे वाहणारा मनुष्य ओझें टाकून विश्रांति पावतो त्याप्रमाणें संसारातील व्यापाराचा त्याग झाला असतां जो हलकेपणा वाटतो तीच येथे विश्रांति ॥ १२५॥
याप्रमाणे परम विश्रांति पावलेला पुरुष औदासीन्य दशेप्रमणे सुख दुःख दशेचेठायीही त्या मुख्यानंदाकडेच लक्ष देऊन असतो. ॥ १२६ ॥
ज्याप्रमाणें अग्नीमध्यें शीघ्र प्रवेश करण्याची इच्छा झाली असतां सती जाणाऱ्या स्त्रीचे अलंकाराविषयीं वैरस्य होतें त्याप्रमाणें धीर पुरुषास ब्रह्मानुसंधानाला विरोध न करणाऱ्या विषयसुखाविषयी विसर प्राप्त होतो. ॥ १२७ ॥
सुख ब्रह्मानंदाला विरोधी नाही, अशा सुखाच्या वेळीं तत्त्ववेत्त्याची बुद्धि कावळ्याच्या दृष्टीप्रमाणें एकदा त्या सुखाकडे आणि एकदा ब्रह्मानंदाकडे अशा येरझारा करीत असते. ॥ १२८ ॥
कावळ्याच्या दृष्टीचा असा स्वभाव आहे कीं ती एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे येते; कारण मनुष्याप्रमाणे त्याला दोन बुबुळे नाहींत. तत्त्ववेत्त्याची बुद्धीही अशीच दोन आनंदांमध्ये येरझारा घालते. ॥ १२९ ॥
ज्याप्रमाणें दुभाषी दोन्हीही भाषा जाणतो, त्याप्रमाणें तत्त्ववेत्ता लौकिक व वैदिक म्हणजे विषयानंद आणि ब्रह्मानंद या दोहींचा अनुभव घेतो. ॥ १३० ॥
एखादें दुःख प्राप्त झालें असतां अशा पुरुषाच्या मनात उद्वेग होत नाहीं असें नाही. कारण तो धर्माचा आहे, परंतु अज्ञान्यास जसा होतो तसा त्यास होत नाहीं. कारण त्याची दृष्टि आतां दोन्ही, बाजूंकडे असते. ज्याप्रमाणें नदीत कमरे इतक्या पाण्यांत उभा राहिलेल्या मनुष्यास शीत व उष्ण या दोहींचा अनुभव येतो, त्याप्रमाणें याची दृष्टि दोहींकडे असते. ॥ १३१ ॥
याप्रमाणे जागृतींत तत्त्ववेत्त्याला ब्रह्मसुख सदा सर्वदा भासते. तसेंच त्या वासनेपासून उत्पन्न होणाऱ्या स्वप्नांतही भासते. ॥ १३२ ॥
केवळ सुखच भासतें असें नाहीं. जशी आनंदवासना असते, तशी अविद्यावासनाही असते. त्यामुळें त्यापासून उत्पन्न होणाऱ्या स्वप्नांत देखील मूढाप्रमाणें यालाही सुखदुःख भासतात. ॥ १३३ ॥
एथवर ब्रह्मानंद प्रकरणामध्ये योग्यास प्रत्यक्ष होणारा जो ब्रह्मानंद तो या प्रथमाध्यायी आम्ही सांगितला. ॥ १३४ ॥