पंचदशी – प्रकरण ०५ – महावाक्यविवेकः
येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च ।
स्वाद्वस्वादू विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥ १ ॥
गु० – आतां तुला चार वेदांतील चार महावाक्यांचा अर्थ क्रमेंकरून सांगतो. त्यांत प्रथमतः ऋग्वेदापैकी ऐतरेयारण्यकोपनिषदांतील ”प्रज्ञानं ब्रह्म” या महावाक्यांतील ”’प्रज्ञान” शब्दाचा अर्थ सांगतो. ज्या चैतन्याच्या योगेंकरून हा जीव पहातो, ऐकतो, वास घेतो, बोलतो व हें गोड आणि हें कडू असें रसनाद्वारें जाणतो, त्यास ”प्रज्ञान” असें म्हटलें आहे. शि० – “प्रज्ञान” या शब्दाचा अर्थ समजला. आतां ब्रह्म म्हणजे काय तें कृपा करून सांगा. ॥ १ ॥
चतुर्मुखेन्द्रदेवेषु मनुष्याश्वश्वगवादिषु ।
चैतन्यमेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि ॥ २ ॥
गु० – ब्रह्मादिदेवांचेठायीं मनुष्याचेठायी गवाश्वादि पशूंचेठायी आणि आकाशादि पंचभूतांचेठायी जन्मस्थितिलयांस हेतुभूत सर्वत्र व्यापून असणारे जें चैतन्य, तेंच ब्रह्म – येणेंकरून ”एष ब्रह्मा” ”एष इंद्र:” इत्यादि अवांतर वाक्यांचाही अर्थ सांगितल्यासाररवा झाला. असें जें सर्वत्र व्यापून असणारे जें प्रज्ञान तें जर ब्रह्म आहे, तर माझ्याठायीं व्यापून असणारे जें प्रज्ञान तेही असलेंच पाहिजे. हेंच या वाक्याचे तात्पर्य. शि० – हे ऋग्वेदातील महावाक्य झालें. आतां यजुर्वेदापैकीं बृहदारण्यकोपनिषदांतील ”अहं ब्रह्मास्मि” या महावाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा. ॥ २ ॥
परिपूर्णः परात्मास्मिन्देहे विद्याअधिकारिणि ।
बुद्धेः साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितीर्यते ॥ ३ ॥
गु० – बरे आहे. प्रथम ”अहं” शब्दाचा अर्थ सांगतो. देशकालवस्तुपरिच्छेदरहित परिपूर्ण असा परमात्मा, तत्त्वज्ञानास अधिकारी अशा देहाचेठायीं बुद्धीचा साक्षी होऊन जो प्रकाशत आहे, त्यालाच येथें “अहम्” असें म्हटलें. ॥ ३ ॥
स्वतः पूर्णः परात्मात्र ब्रह्मशब्देन वर्णितः ।
अस्मीत्यैक्यपरामर्शस्तेन ब्रह्म भवाम्यहम् ॥ ४ ॥
आतां ब्रह्म शब्दाचा अर्थ ऐक. स्वभावत: जो देशकालवस्तु परिच्छेदरेहित सर्वत्र व्यापून असणारा परमात्मा तोच येथें ब्रह्म असें समजा. ”अस्मि” या क्रियापदाने, ”अहम्” आणि ”ब्रह्म” या दोन पदाचे सामानाधिकरण्य करून, जीवब्रह्माचें ऐक्य दर्शविले. म्हणून मीच ब्रह्म आहें, असें या महावाक्याचें तात्पर्य आहे. शि० – ”प्रज्ञानं ब्रह्म ” आणि ”अहं ब्रह्मास्मि ” या दोन महावाक्यांचा अर्थ समजला. आतां सामवेदापैकी छान्दोग्य श्रुतीतील ”तत्त्वमसि ” या वाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा. ॥ ४ ॥
एकमेवाद्वितीयं सन्नामरूपविवर्जितम् ।
सृष्टेः पुराधुनाप्यस्य तादृक्त्वं तदितीर्यते ॥ ५ ॥
”सदेवसौम्येदमग्रआसीदेकमेवाद्वितीयम्” या श्रुतीने सृष्टीच्या पूर्वी जी स्वगतादि भेदशन्य नामरूपरहित सद्वस्तु होती, ती आताही तशीच आहे, असें दाखविण्यासाठी येथें तत्पदाचा उपयोग केला म्हणून तत्पदाचा अर्थ तीच सद्वस्तु असें समजावें. ॥ ५ ॥
श्रोतुर्देहेन्द्रियातीतं वस्त्वत्र त्वं पदेरितम् ।
एकता गृह्यतेऽसीति तदैक्यमनुभूयताम् ॥ ६ ॥
आणि उपदेश श्रवण करणारा जो शिष्य त्याच्या देहेंद्रियांचा जो साक्षी म्हणजे तिन्ही शरीरास जो पहाणारा तोच येथें त्वंपदानें दाखविला. आणि, ”असि” म्हणून जें क्रियापद या वाक्यांत आहे त्यानें “तत्” आणि ”त्वम्” या दोन्ही पदांचे ऐक्य सांगितले, त्याचा अनुभव मुमुक्षूंनी घ्यावा. शि० – आतां चौथे जे महावाक्य “अयमात्मा ब्रह्म” त्याचा अर्थ सांगावा ॥ ६ ॥
स्वप्रकाशापरोक्षत्वमयमित्युक्तितो मतम् ।
अहङ्कारादिदेहान्तात्प्रत्यगात्मेति गीयते ॥ ७ ॥
गु० – “अयम्” या शब्दाचा अर्थ असा कीं, आत्मा हा अवेद्य असून स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे. तो अदृश्य पदार्थासारखा परोक्षही नाहीं, व घटादि पदार्थासारखा दृश्यही नाही, असें दाखविण्यासाठी येथे ”अयम्” या पदाची योजना केली. शि० – अहो, पण आत्मा हा शब्द देहालाही केव्हां केव्हां लावतात. मग या महावाक्यांतील ”आत्मा” या शब्दाचा विवक्षित अर्थ कोणता ? गु० – अहंकारापासून देहापर्यंत जितकी म्हणून जड तत्त्वें आहेत त्या सर्वांचा तो साक्षी तोच येथें आत्मा असे समजावे. शि० – ब्रह्म शब्दाचाही विवक्षित अर्थ समजला पाहिजे. कारण, ब्राह्मणादिकांनाही ब्रह्मच म्हणतात. या करितां तो कृपा करून सांगावा. ॥ ७ ॥
दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते ।
ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् ॥ ८ ॥
इति महावाक्यविवेकोनाम पञ्चमः परिच्छेदः ॥ ५ ॥
गु० – तूं म्हणतोस ते खरे आहे. या वाक्यांतील ब्रह्म शब्दाचा अर्थ असा आहे कीं, जितके म्हणून दृश्य पदार्थ आहेत त्या सर्वांचे जें अधिष्ठान तत्त्व तेंच येथें ब्रह्म असें समजावें. हें ब्रह्म सच्चिदानंदरूप आहे. तें व वर सांगितलेला आत्मा ही दोन्ही एकच आहेत. असें या महावाक्याचें तात्पर्य ॥ ८ ॥
इति महावाक्यविवेकः समाप्तः ।